गुंतवणूकदाराना दिलासा देण्यासाठी दत्ता फुंदे व संतोष गायकवाड यांनी घेतला पुढाकार

शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ :  परिसरातील काही शेअर ट्रेडिंग मार्केटिंग व्यावसायिक कोटयावधीची माया गोळा करून रात्रीतून पळून गेल्याने अनेक  गुंतवणुकदार अक्षरश: आयुष्यातून उठले आहेत. त्यामुळे काही दुर्घटना घडण्याच्या मार्गावर आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी व रस्त्यावर आलेल्या गुंतवणूकदाराना दिलासा देण्यासाठी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे व संतोष गायकवाड हे आता सरसावले आहेत.

यासंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असून गुन्हा दाखल न झाल्यास संबंधित गावातून लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. शेवगाव परिसरात गेल्या काही दिवसापासून अधिक परताव्याचे अभिष दाखवून असंख्य लोकांकडून कोट्यावधीची माया गोळा केल्या नंतर काही शेअर ट्रेडर धारकांनी रात्रीतून आपला गाशा गुंडाळून पोबारा केल्याने अनेक गुतवणुकदारांचे धाबे दणाणले आहेत.  

आता आपल्या पैशाचे काय याची चिंता अनेक गुंतवणुकदारांना पडली आहे. शेअर ट्रेडींग मार्केटींग करणाऱ्या व्यावसायिकांची अलिशान कार्यालये, महागड्या गाड्या, उंची राहणीमान पाहून, दलालाच्या प्रचाराला बळी पडून आणि अति लोभापायी यातील गुंतवणूकदारांनी शेत माल विकून, काहींनी सोनेतारण ठेवून, काहींनी बचत गटाचे कर्ज घेऊन, काहींनी बँका पतसंस्था मधील मुदत ठेव पावत्या मोडून गुतवणूक केली.   

दरम्यान काही शेअर ट्रेडींग मार्केटींग व्यावसायिकानी सर्व चंबूगबाळ गुंडाळून कुटुंबासह रात्रीतून पलायन केल्याने जादा व्याज तर दूरच, मुद्दलाची देखील वसूली होण्याची पंचाईत झाली. पोटाला चिमटा देऊन, पै-पै करून जमा केलेली आयुष्याची पुंजीच गेल्याने पूर्ण नागवले गेलेले गुंतवणूकदार रस्त्यावर आल्याने दोघांनी आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेअर ट्रेडिंग मार्केटमध्ये फसलेल्या दुर्दैवी गुंतवणुकदारांसी सवांद साधून त्यांची मनोभूमिका जाणून घेण्याच्या उद्देशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे व संतोष गायकवाड यांनी लक्ष घालण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.

यांच्या पुढाकाराने गुरुवारी तालुक्यातील चापडगाव येथे पार पडलेल्य पहिल्याच प्राथमिक बैठकीत चापडगाव परिसरातील गदेवाडी, बेलगाव, आंतरवाली, सोनविहिर, वरखेड, खामपिंपरी, प्रभूवाडगाव गावातील शंभरावर नागरिकानी उपस्थिती लावली. यावेळी अनेकांना आपल्या व्यथा मांडतांना आश्रू अनावर झाले. काही जणांनी त्यांनी पैसे जमा केलेल्या पावत्या त्या बदल्यात हमी म्हणून दिलेले धनादेश बरोबर आणले होते.

यावेळी फुंदे व गायकवाड यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार द्यावी लागेल. असा विचार व्यक्त केला तेव्हा उपस्थित सर्व गुंतवणुकदारांनी एकमुखी पाठीबा दिला. त्यानुसार येत्या दोन दिवसात सविस्तर निवेदन तयार करून जिल्हाधिकारी, प्रातांधिकारी, तहसीलदार, शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी पोलिस निरीक्षक, यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन रीतसर फिर्याद दाखल करण्यात येणार आहे.

संबंधितांकडून दखल घेण्यात आली नाही. तर संबंधित गावांचा ठराव करून लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फुंदे व गायकवाड यांनी दिली.