हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सर्वेक्षण पहाणी

शेवगाव प्रतिनिधी, दि.२२ :  राज्य परिवहन महामंडळाच्या मोहिमा, स्पर्धा हा आपणांस स्वच्छता उपक्रमाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रेरित करण्याचा भाग आहे. आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसे सर्वांनी बसस्थानक आपले घर समजून त्याची स्वच्छता ठेवण्याची जाणीव प्रवाशामध्ये करून दयायला हवी. फक्त स्वच्छता कामगाराचेच हे काम नव्हे तर संपूर्ण आगार स्वच्छ राहिल यासाठी सर्वांनीच दक्षता घ्यायला हवी.

त्यासाठी सर्वांनी समन्वय राखून लोकांमध्ये स्वच्छते बद्दल जागृती करावी असे आवाहन ‘हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे’ स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सर्वेक्षण समिती प्रमुख तथा सोलापूर विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी येथे केले. महाराष्ट्रराज्य परिवर्तन महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या, ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे’ स्वच्छ सुंदर बस स्थानक उपक्रमा अंतर्गत सर्वेक्षण समितीने सोमवारी शेवगाव बसस्थानकाला भेट देऊन  तपासणी केली. यावेळी भालेराव शेवगाव आगारातील अधिकारी, कर्मचाऱ्याच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.

सर्वेक्षण समितीने प्रथम बसस्थानक परिसर, खासगी वा अवैध प्रवासी वाहन थांबे, महिला-पुरुष स्वच्छता गृहे, कर्मचाऱ्यांची विश्रांतीगृह,वेळापत्रक, सूचनाफलक उभ्या असलेल्या एसटी गाड्यांची स्थिती, कार्यशाळेतील कामे आदि बारीक सारीक तपशीलवार पाहणी केली. 

त्यानंतर आयोजित बैठकीत भालेराव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सोलापूर विभाग स्थापत्य अभियंता श्रीकांत सूर्यवंशी, सोलापूर विभाग कर्मचारी वर्ग, अधिकारी चंद्रकांत घाटगे यांचे सह स्थानिक सर्वेक्षण समिती सदस्य म्हणून पाचारण केलेले. विजय चिकणे हे प्रवासी मित्र तर माध्यमाचे प्रतिनिधी म्हणून दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी प्रा.जनार्दन लांडे पाटील उपस्थित होते.

यावेळी आगार व्यवस्थापक अमोल कोतकर यांनी समिती सदस्याचे स्वागत करून शेवगाव बसस्थानकाचे काम लवकरच पूर्ण होणार असून समितीने केलेल्या मार्ग दर्शनानुसार संपूर्ण आगार स्वच्छ सुंदर ठेवण्याचा समन्वय ठेवून प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी कार्यशाळा अधीक्षक अनमोल फंड, सहाय्यक वाहतूक अधीक्षक किरण शिंदे, वाहतूक नियंत्रक सोमनाथ देवढे, प्रकाश खेडकर, कार्यशाळा प्रतिनिधी विष्णू मिसाळ, गणेश दारकुंडे उपस्थित होते. वरिष्ठ लिपिक आदिनाथ लटपटे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.