प्रभू रामचंद्राचा जयघोष करीत बस अयोध्येला मार्गस्थ

शेवगाव प्रतिनिधी, दि.२ :   तालुक्यातील घोटण येथून भाविकांना घेऊन श्री क्षेत्र आयोध्येसाठी शेवगाव आगाराची पहिली निम आराम बस बुधवारी श्री प्रभूराम चंद्राचा जयघोष करत मार्गस्थ झाली.

या बस मध्ये घोटण सह परिसरातील एकूण ४३ भाविकांचा समावेश आहे. वाहतूक नियंत्रक प्रकाश खेडकर, चालक राजेंद्र घुगे, प्रदीप वाघ हे बस समवेत गेले आहेत. मागील महिन्यात जिल्ह्यातील तारकपूर आगारातून आयोध्याकडे भाविकांची पहिली बस गेली होती, त्या समवेत चालक वाघ हे असल्याने त्यांना मार्गस्थ झालेल्या बस बरोबर अनुभवी चालक म्हणून पाठविण्यात आले आहे.

जिल्हा वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे, शेवगावचे आगार व्यवस्थापक अमोल कोतकर, स्थानक प्रमुख किरण शिंदे, प्रशासकीय अधिकारी ऋषिकेश सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक आदिनाथ  लटपटे, गणेश दारकुंडे आदींनी भाविकांना निरोप दिला. या बसचा एकूण पाच दिवसाचा प्रवास असून श्री क्षेत्र वाराणसी काशी, ओंकारेश्वर उज्जैन व आयोध्या दर्शन दि. २९ पर्यंत ही बस पुन्हा भाविकांना घेऊन घोटण येथे परतणार असल्याची माहिती कोतकर यांनी दिली.

प्रत्येक प्रवाशाला सात हजार रुपये प्रवास भाडे आकारण्यात आले आहे. तालुक्यातील कोणत्याही गावातून भाविक प्रवासी उपलब्ध झाल्यास श्री क्षेत्र आयोध्येसाठी विशेष बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक कोतकर स्थानक प्रमुख शिंदे यांनी दिली.

नगर नंतर शेवगाव आगाराने श्रीक्षेत्र आयोध्या दर्शनसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष बस उपलब्ध करून दिल्याने तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने पी. बी. शिंदे राजाभाऊ लड्डा यांनी आगारातील अधिकारी कर्मचाऱ्याचे आभार मानले आहेत.