बाजारपेठेचे मुल्य निच्चांकी, पण कराचे मुल्य उच्चांकी

 कोपरगाव नगरपालीकेचा अजब कारभार!

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगावची बाजारपेठ असुन नसल्यासारखी आहे. काही ठराविक व्यापाऱ्यांच्या जोरावर व  तालुक्यातील काळे कोल्हे यांच्या ताब्यातील दोन सहकारी साखर कारखान्याच्या जोरावर कशी बशी बाजारपेठ तग धरुन आहे. सना सुदीला कधीतरी बाजारपूठेत गर्दी दिसते अन्यथा मुख्य बाजारपेठेतील व्यापारी ग्राहकांच्या प्रतिक्षेत दिवसभर दुकानातील धुळ झटकत बसतात. गुंतवणुकीच्या व दैनंदिन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित व्यवसाय होत नसल्याने अनेक बड्या व्यापाऱ्यांनी कोपरगाव शहराकडे पाठ फिरवली आहे. शहरातील काही नामवंत व्यवसायीकांनी शेजारच्या मोठ्या शहरात जावून मोठमोठी दुकाने थाटली. कोपरगाव शहरातील बहुतांश नागरीक येथील वातावरणाला कंटाळून स्थलांतर होण्याचा निर्णय घेत आहेत, तर काहींनी घेतला सुध्दा.

शहराचा ८० टक्के भाग पुररेषेत असल्याने त्या भागाचा विकास करणे किंवा त्या जागेत इमारती बांधता येत नाहीत. जरी बांधल्या तरी त्यांना शासकीय नियमाप्रमाणे अपेक्षित मुल्य नाही. कोपरगाव शहरातील मालमत्तेला दैनंदिन व्यवहारात इतर शहरांच्या तुलनेत अतिशय कमी मुल्य आहे. इतर जिल्ह्यांतील व  तालुक्यातील खेडेगावच्या बाजारपेठेचे मुल्य वाढले पण कोपरगाव शहराचे मुल्य कमी झाले. इतकी भयानक अवस्था कोपरगाव नगरपालीकेच्या हद्दीतील मालमत्ता धारकांची असताना कोपरगाव नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातुन नागपुरच्या आर. एस.कंट्रक्शन्स या कंपनीने शहरातील मालमत्ता धारकांच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करून अचानक मालमत्तेचे मुल्यांकन वाढवल्याने कोपरगावच्या नागरीकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अतिक्रमण जागेत कच्चे बांधकाम असलेल्या पञ्याच्या खोलीचे मुल्य लाखात केले.

शहरातील अनेक मालमत्ता धारकांच्या मालमत्तेचे मुल्य अर्थात बाजार भाव वाढवून दाखवल्याने कधी नव्हे ती कोपरगावची बाजारपेठ जिल्ह्यात नंबर वन असल्याचे पालीकेने सिध्द केले. इतकेच नाही तर पालीकेने आगामी घरपट्टी भाडे मुल्यावरुन थूट भांडवली मुल्यावर आकारणी केल्याने. डबघाईत असलेल्या बाजारपेठेतील व्यवसायीकांची घरपट्टी अव्वाच्या सव्वा वाढली. कामगारांना जसे दिवाळीला अचानक बोसन वाढीव मिळावा तसा प्रकार पालीकेने पिचलेल्या कोपरगावकरांना वाढीव घरपट्टीचा हा ञासदायी बोनस दिवळाच्या तोंडावर दिल्याने कोपरगावकरांची ही दिवाळी त्यांचे दिवाळं काढणारी ठरु शकते. सनासुदीच्या तोंडावर जिल्ह्यातील एकमेव कोपरगाव पालीका आहे की,  सर्वात ज्यास्त घरपट्टी वसुल करण्याच्या तयारीत आहे.

ज्या शहराचे भांडवली मुल्य विक्रमी आहे त्या शहरातील नागरीकांना संबंधित नगरपालीका भाडे मुल्यावर कर आकारणी करते. शिवाय २० टक्क्याच्या पुढे जिल्ह्यातील एकाही नगरपालीकेने कर वाढ केली नाही. कोपरगाव नगरपालीका डबघाईत आहे, बाजारपेठ सलाईनवर आहे. येथील भांडवलदार डबघाईला वैतागून गाव सोडून चालले. अशा अवस्थेतील पालीकेने नागरीकांना थेट वाढीव भांडवली मुल्यावर कर लादण्याचा नियम करुन नागरीकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार केल्याने या वाढीव करवाढीच्या विरोधात नागरीकामधुन संताप व्यक्त होतोय. 

 कोपरगाव नगरपालीकेने आपल्या हद्दीतील मालमत्ताधारकांच्या मालमत्तेचे गुणांकन तपासण्या बरोबर मालमत्तेचे मोजमाप करुन योग्य तो अहवाल सादर करण्याचे काम आर एस  कंट्रक्शन  या कंपनीला दिले होते. जितक्या मालमत्तांचे सर्वेक्षण अहवाल दिले जातील तितकच पैसे देणार असल्याने संबधीत कंपनीने अनेक ठिकाणी चुकीचा सर्वे करुन मालमत्ताधारक व त्यांच्या मालमत्ते मुल्य वाढवून कोपरगाव पालीकेकडून वाढीव पैसे लाटण्याच्या नादात संपूर्ण कोपरगाव पालीकेच्या हद्दीतील नागरीकांचा चुकीचा अहवाल देत कराच्या रुपाने त्यांची फसवून केली. 

दरम्यान संबंधित कंपनीने चुकीचा अहवाल सादर केल्याचे कोणाच्याही लक्षात कसे आले नाही. गेल्या दिडवर्षापासुन संबंधित कंपनी नागरीकांच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करताना चुकीचे करत आहे.  नागरीकांच्या आर्थीक विषयाचे हे काम करीत असताना तत्कालीन मुख्याधिकारी, विद्यमान मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, पालीकेचे संबंधित कर्मचारी, सुज्ञ समाजसेवक, दक्ष नागरीक यांच्या पैकी कोणाच्याही लक्षात कसे आले नाही. अनेक विद्वान किरकोळ बाबीवर आगपाखड करतात मग या गंभिर बाबीकडे डोळेझाक का केली. 

जिल्ह्यातील एकमेव पालीका आहे. जिथे सर्वात ज्यास्त कर लादला जाणार आहे याची कल्पना एकालाही का आली नाही. अव्वाच्या सव्वा करवाढ करताना संबंधित पालीका अधिकारी व्यवक्तीगत पातळीवर निर्णय घेवू शकत नाहीत. कोणाची तरी सहमती दर्शविल्या शिवाय इतका मोठा निर्णय होवू शकतो का? टपरी आणि छपरीने व्यापलेल्या शहरातील नागरीकांना कधीच दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी मिळाले नाही. शहरातील रस्त्यावरुन प्रवास करताना  हाडे खिळखिळे झाले पण अनेक वर्षांपासून चांगले रस्ते झाले नाहीत.

जरी झाले तरी सहा महीण्यात पुन्हा जैसे थे. अपेक्षित नागरी सुविधा नाहीत. म्हणुनच येथील मुळरहीवाशी स्थलांतरीत होतोय. नवीन युवा पिढी मुंबई, पुणे व इतर शहरांना पसंदी देत असल्याने भविष्यात जेष्ठ नागरीकांचे गाव म्हणजे कोपरगाव अशी नविन ओळख निर्माण होवु नये. इतक्या वाईट अवस्थेत असलेल्या कोपरगावचे मुल्य कधी वाढणार म्हणुन चिंतेत असलेल्यांची चिंता कोपरगाव नगरपालीकेने काही क्षणात दूर करुन थेट मालमत्तेचे भांडवली मुल्य वाढवून घरपट्टीत चारशे ते पाचशे पटीत वाढ केली.

 दरम्यान वाढीव घरपट्टी बाबत नागरीकांच्या  वाढत्या तक्रारीवरून  आमदार आशुतोष काळे यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याशी चर्चा करुन घरपट्टी कमी करण्या बाबत मध्यम मार्ग म्हणून ४० टक्के घरपट्टी भरण्याचा तोडगा काढत  दिलासा दिला तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वाढीव घरपट्टीच्या विरोधात  गेल्या तिन दिवसांपासून साखळी उपोषणाच्या माध्यमातुन पालीका प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आक्रोश व्यक्त करीत आम्हाला  कोणतीही घरपट्टी वाढ नको आहे.

जुन्या घरपट्टी प्रमाणे घरपट्टी आकारण्या बरोबर भाडे मुल्यानेच आकारण्याची मागणी लावून धरल्याने शहरातील वातावरण तणावाखाली आहे. हजारो नागरीकांच्या हरकती, पालीका प्रशासनाने पालीकेच्या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करणे, भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले साखळी उपोषण, आजी- माजी आमदार यांच्यातील मतभेद, दोन्ही गटातील वादविवाद, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे दररोज येणारे निवेदने यावरुन पालीका प्रशासनाची विशेषतः मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची कोंडी झाली आहे.  कोपरगावच्या नागरीकांना या सर्व प्रकारातुन दिवाळीच्या तोंडावर कसा दिलासा मिळतोय हे पहाणे महत्वाचे आहे. 

 आर.एस कंट्रक्शन या कंपनीने औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगरपालीकेच्या हद्दीतील मालमत्ता धारकांच्या मालमत्तेचे सर्वेक्षणचुकीचे केले म्हणून त्या पालीकेने वाढीव करवाढ रद्द केली त्याच अधारे कोपरगाव नगरपालीक संबंधित कंपनीने केलेला सर्वेक्षण चुकाचा असल्याने वाढीव कर वाढ रद्द करणार का तसेच भांडवली मुल्यावरून जुन्या भाडे मुल्या प्रमाणे कर आकारणी करणार की, नव्या भांडवली मुल्याने आकारणी कायम ठेवणार या निर्णयाकडे मालमत्ता धारकांचे लक्ष लागले आहे.