कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : शिर्डीमधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी वंचित बहुजन आघाडीने कार्यकर्त्यांची प्रचंड सभा घेतली. त्यानंतर वंचितने उत्कर्षा रुपवते यांची प्रचंड रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे.
उत्कर्षा रुपवते यांची सभा सुरू असतानाच अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी फोन करून वंचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणूक निकराने लढण्याचे आदेश दिले. वाहन किंवा कोणत्याही साधनांच्या अभावामुळे कार्यकर्त्यांनी अडून न राहता उत्कर्षा रुपवतेंना बहुमताने निवडून आणण्यासाठी मेहनत करावे, असे आदेश दिले. सोबतच त्यांनी उत्कर्षा रुपवते यांना निवडणूकीसाठी शुभेच्छा दिल्या.
उत्कर्षा रुपवते यांची टोलेबाजी- यावेळी उत्कर्षा रुपवते यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचे नाव न घेता समाचार घेतला. एक उमेदवार हे ‘मिस्टर इंडिया’ असून मतदारसंघात कधीच दिसत नाहीत,असा टोला सदाशिव लोखंडे यांना लगावला.
दुसरे उमेदवार हे एकदा रिटायर झाले असून आता त्यांना राजकारणातून कायमचे रिटायर व्हायची वेळ आली आहे, अशी टीका रुपवतेंनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर केली. वाकचौरे आणि लोखंडे हे फक्त एकमेकांवर घोटाळ्याचे आरोप करतात,पण महिला युवा, शेतकरी यांच्या समस्यांबद्दल एक शब्द ही काढत नाही, अशी टीका रुपवते यांनी केली.
यावेळी वंचितच्या राज्य उपाध्यक्ष आणि प्रवकत्या पिंकी दिशा शेख यांनी वाकचौरे आणि लोखंडे हे जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर मौन बाळगून आहेत. अशी टीका केली. गरजवंत मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील तरुण कार्यकर्ते सहभागी दत्ता ढगे पाटील यांनी रुपवते यांना पाठिंबा व्यक्त केला.
गोविंदराव कांदळकर यांनी पारंपरिक घोंगडी आणि काठी देऊन उत्कर्षा रुपवते यांना धनगर समाजाच्या वतीने पाठींबा दिला. जालिंदर आखाडे यांनी वंजारी समाजाच्या वतीने पाठींबा दिला. आदिवासी समाजाने देखील यावेळी ऍड संघराज रुपवते, दादासाहेब रुपवते, यांच्या पत्नी सुशीला रुपवते उपस्थित होते.
यावेळी अरुण जाधव, अजीजभाई वोहरा, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, युवक जिल्हा अध्यक्ष सचिन बनसोडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे विविध तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शिर्डीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते आणि महायुती भाजपचे विदयमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे.