कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : पती-पत्नीत चारित्र्याच्या संशयावरून होणाऱ्या भांडणाच्या वादातून स्वत:च्या पोटच्या पाच महिन्याच्या मुलाला सख्या आईनेच मारहाण करून गळा दाबून ठार करून विहिरीत टाकून देण्याची क्रूर घटना तालुक्यातील कारवाडी येथे घडली. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव जाधव यांनी खुनी आई गायत्री सुरज माळी हिला अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत मयत मुलाचे वडिल सुरज शंकर माळी रा. कारवाडी, दंडवते वस्ती यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कारवाडी येथे माळी कुटुंब शेत मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. पती सुरज पत्नी गायत्रीवर अनैतिक संबध असल्याचा संशय घेत असल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत असे.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास माळी कुटुंबीय शेतात मजुरी करत असताना घरी शिवम व गायत्री होते. सातत्याने होणाऱ्या भांडणाच्या रागातून गायत्रीने शिवमला मारहाण करून गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह शेजारी असलेल्या विहिरीत टाकून दिला.
दोन अज्ञात लोकांनी शिवमला उचलून नेल्याचा बनाव केला. सुरज व नातेवाईकांनी अज्ञातांचा शोध घेतला असता ते सापडले नाही. दरम्यान माळी व नातेवाईकांनी तालुका पोलीस ठाण्यात कळवले. दरम्यान पोलिसांना मयत शिवमची आई गायत्री हिचा संशय आला. त्यातून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता चारित्र्यावर संशय व सदर मुलगा माझा नाही म्हणत रोजच्या भांडणाच्या कारणाला वैतागून शिवमला ठार केल्याची व दोन जणांनी पळवून नेल्याचा बनाव केल्याची कबुली गायत्रीने दिली असल्याचे जाधव यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहे.