कृषी विभागामार्फत शेती शाळेद्वारे पिकावरील कीड, रोग सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन 

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : राज्य शासनाच्या कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना शेती बाबतचे सतत मार्गदर्शन होत असते. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील बोधेगाव मंडलातील बालमटाकळी व गायकवाड जळगाव येथील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत नुकतीच एक शेती शाळा घेण्यात आली. यासंदर्भात कृषी सहाय्यक गणेश पवार यांनी माहिती दिली.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा अंतर्गत शेती शाळा द्वारे फलोत्पादन पिकावरील कीड, रोग सर्वेक्षण व व्यवस्थापन या प्रकल्पाच्या माध्यमातून डाळिंब, संत्रा, मोसंबी, सिताफळ या क्षेत्रीय स्तरावरील पीक निहाय तंत्रज्ञान कौशल्य शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी व सुधारित प्रजा तंत्रज्ञानाचा वापर, हवामान अनुकूल, पर्यावरण पूरक शाश्वत पीक उत्पादन, प्रत्यक्ष कृतीद्वारे मित्र किडी शत्रू किडी याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले.

तसेच पीक परिसंस्थेचे निरीक्षण, चित्रीकरण, सादरीकरण व चर्चा समूह गुणदर्शन विशेष अभ्यास, लघु अभ्यास व शेती शाळेचा मूल्यमापन समारोप अशा पद्धतीने शेती शाळेचे नियोजन करून शेती शाळेचा तिसरा वर्ग संपन्न झाला आहे. यामध्ये पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या सर्व टप्प्यावरील मार्गदर्शन करण्यात येत आहे. ही शेती शाळा काकासाहेब देशमुख यांच्या शेतावर आयोजित करण्यात आली. यावेळी रंगनाथ वैद्य, नामदेव केसभट, प्रशांत ढाकणे, बाळासाहेब दोडके, बळीराम केसभट, कैलास केसभट व अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
      .