दि.१ मे कामगार दिनी समाधी बांधो आंदोलन

शेवगाव प्रतिनिधी, दि.२९ :  अचारसंहितेचे कारण दाखवून शासनाकडून असंघटीत क्षेत्रातील इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनांची वेबसाईट बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांवर मोठा अन्याय होत आहे. शासनाला याबाबत दि.२१ मार्च २०२४ ला निवेदन देऊनही त्यावर कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने, सहायक कामगार आयुक्त अहमदनगर यांच्या कार्यालयावर बुधवार दि.१ मे रोजी ‘कामगार दिनी’ बांधकाम कामगार सर्व साहित्य घेऊन “ समाधी बांधो आंदोलन “ करणार असल्याची माहिती जनशक्ती श्रमिक संघाचे अध्यक्ष संजय दुधाडे यांनी दिली.

शासनाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण दाखवून, बांधकाम कामगारांचे नवीन अर्ज नोंदणी, नुतनीकरण, शालेय शिष्यवृत्ती प्रकरणे, विविध लाभाच्या योजनाची असणारी वेबसाईट बंद केली आहे. त्या त्वरित सुरु करण्यात याव्यात याकरिता जनशक्ती श्रमिक संघटनेच्या वतीने राज्याचे कामगार मंत्री, कामगार आयुक्त कार्यालयाकडे अर्ज निवेदन दिलेले आहे. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

बांधकाम कामगारांना प्रत्येक पावती घेण्यासाठी नगरला जावे लागते. १ रुपयाच्या पावतीसाठी ५०० रुपये खर्च येतो. रोजगार बुडतो वेबसाईट बंद असली तर पुन्हा चक्कर होते. काही कामगाराच्या मुलाचे ३ महिन्यापूर्वी शिष्वृत्तीचे प्रकरण व्हेरीफिकेशन झाले आहे. त्या वेबसाईटचे उत्तर मिळत नाही. एजंटाचा सुळसुळाट झाला आहे तो थांबवण्यात यावा.

बांधकाम कामगारांनी घरकुलाचे प्रस्ताव कार्यालयाकडे जमा केलेले आहेत ते मंजूर करावेत. मध्यान भोजन योजना संघटनेच्या मागणीसाठी बंद केली आहे त्याचे पैसे कामगारांच्या खात्यावर टाकावेत. बांधकाम कामगारांना इलेक्ट्रॉनिक सायकल देण्यात यावी. ६० वर्षापुढील बांधकाम कामगारांना पेन्शन योजना लागू करावी. या  मागण्यासाठी बुधवार दि.१ मे २०२४ रोजी कामगार दिनी  सकाळी ११ वा. ‘समाधी बांधो आंदोलन’ सहाय्य्यक कामगार आयुक्त, कार्यालय अहमदनगर येथे होणार आहे