नागरीकांना होतोय अशुद्ध पाणीपुरवठा, आमदार काळेंनी घेतली दखल

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : कोपरगावच्या नागरिकांना होत असलेल्या अशुद्ध पाणी पुरवठ्याची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच जलशुद्धीकरण केंद्राला भेट देवून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या सूचना कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

कोपरगाव शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रातून कोपरगाव शहरातील नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी मंगळवार (दि.०७) रोजी कोपरगाव शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देवून पाहणी केली.

अशुद्ध पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. साठवण तलावातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे जलशुद्धीकरण करतांना अधिकची काळजी घ्या. जलसंपदा विभागाने आवर्तन सोडण्याची तयारी सुरु केली आहे. लवकरच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार असून त्या आवर्तनातून कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव भरले जातील त्यानंतर अडचणी निश्चितपणे कमी होणार आहे.

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून कोपरगाव नगरपरिषदेणे जलशुद्धीकरण केंद्रात आवश्यक त्या सुधारणा करून नागरीकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.