शेवगाव प्रतिनिधी, दि. ७: स्मशानभूमी बाबत दोन गटात झालेल्या वादातून दगडफेक झाली. ही दगडफेक एका मृताची राख सावडताना झाल्याने गोंधळ उडाला. तालुक्यातील बोधेगाव येथे हा प्रकार घडला.
येथील योगेश पांडुरंग वीर (वय ३०) हा धनगर समाजाचा तरुण शनिवारी मृत्यू पावला. गट नं. १३१ मध्ये १० आर क्षेत्र धनगर वीर (खुटेकर) समाजाची स्मशानभूमी असल्याने त्याच दिवशी या स्मशानभूमित अंत्यसंस्कार झाले. सोमवारी अस्थी सावडताना या स्मशानभूमी लगत राहणाऱ्या दुसऱ्या गटाने विरोध करून शिवीगाळ व दगडफेक केली. तशी तक्रार बोधेगांव पोलीस दुरक्षेत्रात वीर समाजाने केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले, की मृत योगेश वीर यांचा आज सावडण्याचा दिवस असल्याने धनगर (खुटेकर) समाज स्मशानभूमीत गेला होता. वीर स्मशानभूमीत अतिक्रमण केलेल्या वेताळ नाना रुपनर, सुरेश वेताळ रुपनर, गणेश वेताळ रुपनर, राम लाला रुपनर, विठ्ठल लाला रुपनर, विष्णू विठ्ठल रुपनर, इंदुबाई राम रुपनर, काशीबाई सुरेश रुपनर, चंद्रकात (रघुनाथ) येताळा रुपनर यांनी वीर समाजाच्या स्मशानभूमीत येऊन शिवीगाळ करत दगडफेक केली व राख सावडण्यास विरोध केला.
स्मशानभूमीचा वाद कोर्टात होता. त्याचा निकाल वीर यांच्या बाजुने लागला. दरम्यान, आम्ही काहीही केलेले नाही. पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सुरेशा रूपनर यांनी केली आहे.