शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : सध्या लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थासह प्रशासन देखील मोठया हिरीरीने विविध उपक्रमाद्वारे मतदान जागृती मोहिम राबवित आहेत.
येथील तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या संकल्पनेतून शेवगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती, शिक्षण विभाग व शेवगाव सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि ८) संपूर्ण शेवगाव शहरातून मतदान प्रचार सायकल फेरी काढून नागरिकांचे उद्बोधन करण्याची मोहिम राबविण्यात आली.
तहसील कार्यालयापासून सकाळी ७ला सायकल फेरीला प्रारंभ झाला. ही सायकल फेरी संत गाडगेबाबा चौक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, विद्यानगर, इंदिरानगर त्याचप्रमाणे क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ब्राह्मण गल्ली, भगतसिंग चौक, खालची वेस, बाजारपेठ, वडार गल्ली, स्व.गोपीनाथराव मुंडे चौक या मार्गे परत तहसील कार्यालयात येऊन दहाला विसर्जीत झाली.
तहसीलदार सांगडे व शेवगाव सायकल असोसिएशनचे सचिव कैलास जाधव यांनी चौका-चौकात प्रबोधन पर भाषण करून मतदारांना जागृत करण्याचे कार्य केले. यावेळी मतदारही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. या उपक्रमामुळे येथील मतदानाचा टक्का निश्चित वाढणार आहे.
सांगडे म्हणाले, मतदान हे महत्तम दान आहे. भारतीय राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी तो हक्क कुठलेही कारण न सांगता बजावला पाहिजे. असे सांगून सोमवारी दिनांक १३ ला आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. जाधव यांनी तहसीलदार सांगडे यांनी मतदार जागृती मोहिमेत सायकल क्लबला लोकशाहीचा धागा होण्याची संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या सायकल रॅलीत तहसीलदार सांगडे स्वतः सहभागी झाले. यावेळी गटविकास अधिकारी राजेश कदम, अप्पर तहसीलदार राहुल गुरव, नायब तहसीलदार रवींद्र सानप, निलेश वाघमारे, स्वीय सहाय्यक श्रीमती शैलाजा राऊळ, सायकल क्लबचे अध्यक्ष विनोद ठाणगे, डॉ . संदीप बोडखे, वसंत सुरवसे, डॉ .जगदीश कुलकर्णी, डॉ. मुकुंद दारकुंडे, डॉ. कृष्णा देहाडराय, डॉ. संजय लड्डा, विनोद शेळके मेजर, निळकंठ लबडे, सुनील गवळी, निलेश केवळ, प्रदीप बोडखे, संतोष भागवत, प्रा. डॉ .गजानन लोंढे,संजय सुपेकर, सिध्देश देहाडराय, सचिन मुळे, प्रा. मच्छिंद्र आघाट, वल्लभ लोहिया यांचे सह अनेक जण उत्स्फुर्तपणे सहभागी झाले. रमेश गोरे, सचिन भाकरे, कल्याण मुटकुळे, मारूती फरताळे, महसूल सहायक सुरेश बर्डे, दिलीप चव्हाण यांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.