अखेर लोखंडेसाठी कोल्हे प्रचारात, पण विखे गायब  

कोल्हेंची  मनधरणी फडणवीसांनी केली

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ :  शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मैदानात उतरुन प्रचार करीत होते. आजपर्यंतच्या प्रत्येक सभा, कार्यक्रमांना जातीने हजर राहून विखेपाटील अप्रत्यक्ष कोल्हे यांच्यावर निशाणा साधत होते. केवळ विखे यांच्या भूमिकेमुळे कोल्हे परिवार नाराज होता हे लपून राहीले नाही. केवळ विखेमुळे कोल्हे यांनी प्रचारापसुन अलिप्त राहीले.  अखेर  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे परिवाराची नाराजी दूर करुन खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी बुधवारी ९ में रोजी  कोपरगाव येथे संकल्प सभेचे आयोजन केले.

कोल्हे परिवाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माञ या कार्यक्रमाला आले नसल्याने कोपरगावमध्ये पुन्हा चर्चेला उधाण आले. पारंपरिक विरोधक असलेले काळे यांनी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी ते कार्यक्रमाला आले.  कोणावरही टिका टिप्पणी न करता मनोगत व्यक्त करीत मतदार संघातील समस्या मांडल्या. पण ज्यांच्याकडे सर्वांच्या नजरा होत्या ते विखे पाटील माञ  आलेच नाहीत. विखे पाटील कोल्हे परिवार एकञ येणार की काय? आले तरी काय बोलणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण विखे पाटील कोपरगावच्या संकल्प सभेला आले नाही. इतकंच काय तर त्यांना मानणारे कार्यकर्ते सुध्दा आले नाहीत. 

 माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी स्थानिक मतभेद बाजुला सारुन महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी व नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांसह एकवटून खासदार लोखंडे यांना निवडून आणण्याचा संकल्प केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे परिवाराचे व काळे यांचे खास शैलीत कौतूकही केले. माञ या कार्यक्रमाला पालकमंत्री येतील का? आले तर ते कोल्हे परिवारा बद्दल काय बोलतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा विजय प्रतिष्ठेचा केला आहे. अशातच कोल्हे परिवार अंतर्गत कलहामुळे नाराज असल्याने  या नाराजीची चर्चा राज्यभर सुरु होती. अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु मंञी गिरीश महाजन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे परिवाराची समजूत काढली त्यामुळे सध्यातरी  कोपरगाव तालुक्यात लोखंडे यांची प्रचार यंञणा  काळे-कोल्हेमुळे दमदार झाली आहे.

 कोपरगाव तालुक्याचे बडे नेते काळे-कोल्हे हे आपसातील मतभेद विसरुन महायुतीचा धर्म पाळत एकाच मंचावर जरी आले तरी कार्यकर्त्यांमधील धुसफूस सुरुच होती. आमदार काळे मंचावर येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा जयजयकार सुरू केला, तर काळेंच्या कार्यकर्त्यांना प्रतिउत्तर म्हणून कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनी  विवेक कोल्हे यांचा जयजयकार सुरू केला. अखेर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी दोन्ही कार्यकर्त्यांना शांत करताना म्हणाले, दोन्ही नेते आपलेच आहेत असे म्हणत वातावरण शांत केले.