वीज पडून गाय, बैल व तीन मेंढ्या दगावल्या, डाळींब पिकांचे देखील झाले नुकसान

कोपरगाव प्रतिनिधी, दि, १५ : अवकाळी पावसामुळे मंगळवार (दि.१४) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील बक्तरपूर येथे वादळी वाऱ्यासह  गारांचा पाऊस सुरु होवून वीज पडल्यामुळे एक गाय, एक बैल व तीन मेंढ्या दगावल्या असून गारांच्या पावसामुळे डाळिंब पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

याबाबतचे वृत्त समजताच आ.आशुतोष काळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यामुळे प्रशासनाकडून पंचनामा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून जागेवरच पशु-वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत जनावराचे शवविच्छेदन करून झालेल्या नुकसानीचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवार (दि.१४) रोजी कोपरगाव तालुक्यातील बक्तरपूर येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यामुळे उभ्या डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे डाळींबाची झाडे उन्मळून पडली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. तसेच वीज कोसळल्यामुळे तीन मेंढ्या व गिर जातीची गाय व बैल यांचा देखील बळी घेतला आहे.

सदरच्या घटनेची माहिती समजताच आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना सदरच्या घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सुचनेनुसार बुधवार (दि.१५) रोजी सकाळी चासनळीच्या कामगार तलाठी श्रीम. दिपाली विधाते, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कराळे, डॉ. दिलीप जामदार यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन करत सदर घटनेचा पंचनामा करून झालेल्या नुकसानीचा अहवाल प्रशासनास सादर केला आहे.

तसेच कृषी विभागाचे योगेश माळी यांनी गारपिटीमुळे डाळिंब पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक एफ.एम.तडवी, पोलीस पाटील भारत सानप, ग्रामपंचायत सदस्य नाना सानप, गणेश नागरे, माजी सरपंच संजय बोडखे, संजय सानप आदी उपस्थित होते.