पालीकेच्या गलथान कारभारामुळे गटारीत बुडुन तरुणाचा मृत्यू

 कोपरगाव प्रतिनिधी दि.०४ : कोपरगाव शहरातील हनुमान नगर या भागातील गटारीच्या पाण्यात बुडुन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याची तीन मुलं आज अनाथ झाली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, शहरातील हनुमान नगर या भागातील रस्त्यांच्या मधोमध गटारीचा सिमेंट पाईप फुटला होता. संबंधीत गटार दुरुस्त करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी गेल्या तीन वर्षांपासून पालिकेकडे पाठपुरावा केला. माञ, पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले.

सोमवारी सायंकाळी कोपरगाव व परिसरात अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाल्याने सर्वञ पाणीच पाणी झाले होते. याचं दरम्यान स्थानिक रहिवासी सचिन गहिनीनाथ गजर वय- ३० वर्षे हे दिवसभर मजुरीचे काम आटपुन घरी येत असताना राञी लाईट नसल्याने तसेच पावसामुळे सर्वञ पाणी असल्याने रस्त्यातील फुटलेल्या गटारीचा अंदाज न आल्याने सचिन गजर हे त्या गटारीच्या पाण्यात पडून बुडाले. गटारीच्या सिमेंट पाईप मध्ये तोंड घुसल्याने सचिन यांचा श्वास गुदमरला.

स्थानिक नागरिकांनी सचिन गजर यांना गटारीत बाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता संबंधीत डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान सचिन यांचा गटारीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांना समजताच नागरीकांमध्ये पालिका प्रशासनाविरुध्द संतापाची लाट उसळली.

अनेकांनी पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त करीत संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान सचिन गजर हे गरीब असुन ते मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, त्यांना तीन मुलं आहेत. वडिलाचा मृत्यू झाल्याचे तीन मुलांचा आधार पालीकेच्या ढिसाळ कारभारामुळे हिरावला आहे.