कोपरगावच्या मतदारांनी उमेदवारांचे प्रेशर वाढवले

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मतदारांनी चमत्कारी मतदान करुन खासदारकीचं स्वप्न पहाणाऱ्या उमेदवारांचं प्रेशर वाढवले आहे. तालुक्यातील दोन दिग्गज नेत्यांसह इतर नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एक दिलाने खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी प्रचार केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, मुख्यमंत्री शिर्डीला तळ ठोकून होते तरीही शेवटच्या टप्प्यात नागरीकांनी हि निवडणूक हातात घेतली आणि चमत्कारिक मतदान करुन सर्वांची चिंता वाढल्याचे चिञ दिसत आहे.

प्रत्येक निवडणुकीत कोण निवडून येणार हे छातीठोकपणे सांगणारे राजकीय विश्लेषक आज जर तर बोलु लागले. वंचितला किंचीतही महत्व न देणारे आज वंचितांच्या मतांवर शिर्डी लोकसभेचा निकाल अवलंबून असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली. कोण कोणाचे मत खाल्ले हे सुध्दा सांगताना अनेकांना ततमम होतय.

 दरम्यान आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनाही या निकालाची उत्सुकता लागली आहे. झोपडपट्टीतील नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने केलेले मतदान कोणाच्या पारड्यात जाते यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. एकतर्फी वाटणारी शिर्डीची निवडणुक विचार करायला लावणारी ठरली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांचा एकतर्फी बाण विजयाकडे जातो असं वातावरण काहींनी निर्माण केले तर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे परिवाराच्या सहनभुतीच्या लाटेवर आपली विजयाची मशाल पेटवणार अस चिञ निर्माण झालं.

माञ अचानक या दोन्ही उमेदवारांसह अंदाज बांधणाऱ्याचे प्रेशर वाढवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी शेवटच्या क्षणात प्रचारात आघाडी घेत भर उन्हाळ्यात सर्वांना प्रेशर कुकरची हवा करीत दोघात तिसरा सगळं विसरा असं म्हणण्याची वेळ आणली. वंचित हि भाजपची बी टीम म्हणत गाफिल राहीलेल्यांना रुपवते यांनी विजयाची दावेदार असल्याचे कधी सिध्द केले कळाले नाही. सर्वाधिक मत घेणाऱ्या मध्ये रुपवते यांचं नाव चर्चेत आल्यानंतर दुरंगी वाटणारी लढत तिरंगी कधी झाली कळालेच नाही अखेर रुपवते, वाकचौरे, लोखंडे यांच्यातील समाना शेवटी रंगात आला.

या निवडणुकीत कोण बाजी मारणार स्पष्ट कोणीही बोलत नाही. रुपवते यांच्या प्रती अनेकांनी सहनभुती व्यक्त केली तर काहींनी लोखंडे वाकचौरे यांच्या बद्दल पण निश्चित विजय कोणाचा होईल हे कोणीच सांगू शकत नाही. अशी अवस्था प्रथमच या मतदारसंघात झाल्याने अनेक नागरीक तर्कवितर्क लढवून राजकीय रंगत वाढत आहे. नगर दक्षिण मध्ये कोण निवडून येणार हे छातीठोकपणे जसे बोलले जाते तसे उत्तरे बद्द्ल  बोलले जात नाही.

यावरून कोणत्या उमेदवाराला स्पष्ट बहुमत मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणता उमेदवार कोणाचं मतं खेचतो यापेक्षा कोणत्या उमेदवारांमुळे कोणाचा जय पराजय होते याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.