६१ टक्के मतदान झाले ५ टक्क्यांची घसरण
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : देशाची लोकशाही बळकट करायची असेल किंवा आपल्या मतदार संघातील विकासाला चालना देण्यासाठी योग्य व सक्षम उमेदवार निवडून देण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरीकांनी मतदान करणे गरजेचे आहे परंतु नागरीकांना मतदानाचे महत्त्व अपेक्षित प्रमाणात पटले नसल्यामुळे मतदान न करण्यात धन्यता मानणारे अनेक महाभाग आहेत. विशेषतः सुशिक्षित व सुज्ञ नागरीक सर्वाधिक मतदान न करणारे असल्याचे आकडेवारीनुसार दिसुन येते. कोपरगाव विधानसभा मतदार संघात नवीन मतदारांची आकडेवारी वाढली परंतू मतदाचा टक्का घसरला आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सध्या एकुण २ लाख ७९ हजार ६०९ मतदारांपैकी केवळ १ लाख ७१ हजार ४ मतदारांनी अर्थात ६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर तब्बल १, लाख ८ हजार ६०५ म्हणजे ३९ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवून लोकशाहीचा अवमान केला आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांचा फायदा घेतला पण मतदानाला आले नाहीत.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील लोकसभेचे एकूण मतदार – २लाख ७९ हजार ६०९ पैकी १ लाख ७१ हजार ४ मतदारांनी मतदान केले त्यात स्ञी – ७७हजार ५३१, पुरुष – ९३ हजार ४७२ व इतर १ यांचा सामावेश आहे. कोपरगाव शहरातील एकुण ६० हजार २७७ पैकी एकुण ६० मतदान केंद्रावर जाऊन ३५ हजार ५१ नागरीकांनी मतदान केले. सरासरी ५८.१५टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरातील १३० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सर्वाधिक ६८.४९ टक्के तर सर्वात कमी केंद्र क्रमांक ८९ येथे ४८.६७टक्के मतदान झाले.
तर उर्वरित ग्रामीण भागातील मतदान आहे. ग्रामीण भागात सर्वात ज्यास्त मतदान तालुक्यातील हिंगणी येथील केंद्र क्रमांक १५६ येथे ७७७पैकी ६३० मतदारांनी मतदान करु सरासरी ८१.०८ टक्क्याचा विक्रम केला तर सर्वात कमी मतदान तालुक्यातील सुरेगाव, गौतमनगर येथील केंद्र क्रमांक ३५ येथे ६०६ पैकी केवळ १९६ मतदारांनी मतदान करीत सरासरी ३२. ३४ टक्क्याचा निचांकी आकडा गाठला.
तालुक्यात यापुर्वीच्या सन २०१९च्या लोकसभा निवडणुक एकुण मतदार २लाख ६० हजार १२८ होते. पैकी १ लाख ६९ हजार २८९ मतदारांनी मतदान करीत सरासरी ६७.०७ टक्के मतदान केले होते. त्या तुलनेत या निवडणुकीत मतदारांचा आकडा पुर्वी पेक्षा १९ हजार १२६ वाढला असतानाही मतदानाचा टक्का थेट ५.९१ टक्क्याने घसरला आहे. मतदान न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने आगामी काळात लोकशाही धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही.
मतदानाच्या दिवशी काही जेष्ठ नागरीक चालायला येत नसले तरी मिळेल त्याचा आधार घेवून मतदान करून आपला खरा अधिकार सिध्द करतात, परंतु काही तरुण मंडळी मतदानाला ठरवून दांडी मारतात. कोणी ठरवून बाहेरगावी लग्न याञा जञा, पर्यटन करण्यासाठी जातात तर काही लोक घराच्या बाहेर पडत नाही. मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे देशाचे सुजाण नागरिक म्हणुन आपलं कर्तव्य सिध्द करण्याचा दिवस असतानाही काही महाभाग सुट्टी म्हणुन घरी झोपा काढतात.
देशातली नागरीकांची ही वाढत चाललेली उदासीनता आणि निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीची मानसीकता यांचा सरासरी विचार केला तर देशाचं भवितव्य अंधकारमय होण्यास वेळ लागणार नाही. गावखेड्यातला कमी शिकलेल्या कष्टकऱ्यांना लोकशाही व देशाचे महत्व कळले म्हणुनच तालुक्यातील हिंगणी येथे सर्वाधिक मतदान झाले तर सर्वाधिक चाकरमानी वर्ग असलेल्या तालुक्यातील सुरेगाव, गौतमनगर व शिंगणापुर येथे कमी मतदान होणे अपेक्षित नाही.
मतदान न करणाऱ्यांची संख्या पुर्वी हजारात होती ती आता लाखात चालली आहे. नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून प्रशासनाच्यावतीने पंधरा दिवस जनजागृती करण्यात आली. अनेक पथनाट्य सादर करुन प्रबोधन केले तरीही नागरीकांमध्ये जागृती होत नसेल तर हि देशाची शोकांतिका आहे. मतदान न करता स्वहित पहाणाऱ्यानी यापुढे देशाचं हितही पहावे.