जायकवाडीसाठी संपादीत केलेल्या जमीनीचे भुभाडे द्यावे, औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

शेवगांव प्रतिनिधी, दि.२४ :   जायकवाडी जलाशयासाठी वाढीव जमीनीचा ताबा सन १९८४ साली ताबा घेण्यात आला. जमीनीचा ताबा घेतावेळी तटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली परंतु तेव्हापासुन भुभाडे देण्यात आले नव्हते. मौजे एरंडगांव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, अहमदनगर, उपविभागीय अधिकारी, पाथर्डी भाग, भूसंपादन अधिकारी क्र. ९, कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर, पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे भाड्याच्या मागणीसाठी वेळोवेळी विनंती अर्ज करूनही भु-भड्याची रक्कम अदा केलेली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात, औरंगाबाद खंडीपीठ येथे एरंडगांवचे भुमीपुत्र असलेल्या अँड. शिवनाथ भागवत यांच्यामार्फत याचिका दाखल केली.

शेतकऱ्यांच्या याचिकेच्या सुनावणी अंती भुसंपादन अधिकारी क्र. ९ अ.नगर यांना तीन महिन्यात शेतकऱ्यांचे अर्ज निकाली काढुन भू – भाड्याची रक्कम व्याजासह देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आर. वी. घुगे व आर. एम. जोशी यांच्या पिठाने दिले आहेत. त्यामुळे गेल्या ३७ वर्षापासून जमिनीच्या मोबदल्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सदर प्रकरणी याचिका कर्त्यांच्या वतीने ॲङ शिवनाथ भागवत व ॲङ निलेश भागवत यांनी काम पाहिले तर शासनाच्या बाजूने सरकारी वलिकांनी काम पाहिले. अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर जमीनीचा मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व न्यायालयाचे आभार व्यक्त केले.