मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न बनवण्याचे काम कुसुमाग्रजांनी केले – अनिता आढाव

शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ :  कुसुमाग्रजांनी मराठी भाषा ही अलंकारीक भाषेपेक्षा ज्ञान भाषा कशी होईल याकडे लक्ष दिले त्याकरिता त्यांनी विज्ञानावर कविता केल्या, तसेच इंग्रजी साहित्याचे मराठीत रुपांतरीत केले. ज्यामुळे मराठी वाचकांनाही इंग्रजी साहित्य समजण्यास मदत झाली. मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न बनवण्याचे काम कुसुमाग्रजांनी तसेच संत, पंत आणि तंत साहित्याने करून मराठीला अभिजात साहित्याचा दर्जा मिळवून देण्याचा  प्रयत्न केल्याचे प्रतिपादन संत साहित्यिक, संशोधक प्रा.डॉ. अनिता आढाव यांनी केले.

येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मराठी विभागाद्वारे आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन व गुणवंतांच्या सत्कार समारंभात बोलत होत्या. महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरवदिन आणि कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी हिंदी विभाग प्रमुख डॉ. गोकुळ क्षीरसागर म्हणाले,  महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात बोलली जाणारी भाषा, मराठीच आहे. पण तिचे रुप,  स्वरूप आणि लहेजा वेगळा दिसून येतो. लोकसाहित्य याद्वारे देखील मराठी भाषेची गोडी टिकून राहिली आहे.

इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. रवींद्र वैद्य अध्यक्ष स्थानी होते. त्यांचेही भाषण झाले. डॉ.संदीप मिरे, डॉ.गहिनीनाथ शेळके, प्रा.अनिल काळे, प्रा.मोहन वेताळ, प्रा.राम कोरडे, प्रा.सोपान नवथर, प्रा.राहुल ताके, प्रा.मिनाक्षी चक्रे, चंद्रशेखर मुरदारे यांचे सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी काव्य वाचन व निबंध स्पर्धेत क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली. प्रा.डॉ. वसंत शेंडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आशा वडणे यांनी सुत्रसंचलन केले. तर प्रा. अश्विनी गोरखे यांनी आभार मानले.