श्री क्षेत्र सराला बेट पवित्र उर्जास्थान – स्नेहलता कोल्हे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : श्रीक्षेत्र गोदावरी धाम, सराला बेट येथील सदगुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थानच्या माध्यमातून अध्यात्मासह व्यसनमुक्ती, बंधुभाव, देशप्रेम, महिला सशक्तीकरण व समाजप्रबोधनाचे कार्य अखंड सुरू आहे. ब्र. योगीराज सदगुरू गंगागिरीजी महाराज यांनी शेकडो वर्षांपूर्वी सुरू केलेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अखंड चालू आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेट येथील संत-महंतांच्या आशीर्वादाने आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन मा.आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले. 

Mypage

श्रीक्षेत्र गोदावरी धाम, सराला बेट येथील सदगुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थान येथे योगीराज सदगुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १२१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व तुकाराम महाराज गाथा भजन सोहळ्याची सांगता गुरुवारी (११ जानेवारी) श्रीक्षेत्र गोदावरी धामचे मठाधिपती महंत प.पू. रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने असंख्य भाविक-भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली.

Mypage

या सोहळ्यास मा. आ. स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थित राहून ब्रह्मलीन सदगुरु गंगागिरीजी महाराज व ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच महंत प.पू. रामगिरीजी महाराज यांचे संतपूजन करून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, रोहयो व फलोत्पादनमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, दिनेशसिंह परदेशी, गोर्डे पाटील आदींसह सदगुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी, भक्त मंडळ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महंत प.पू. रामगिरीजी महाराज व स्नेहलता कोल्हे व अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीक्षेत्र गोदावरी धाम, सराला बेटला जोडणाऱ्या रस्त्याचे व इतर विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन म्हणाले, श्रीक्षेत्र सराला बेट हे राज्यातील मोठे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी लाखो भाविक येऊन नतमस्तक होतात. या भूमीतून प्रत्येकाला प्रेरणादायी ऊर्जा मिळते. श्रीक्षेत्र सराला बेटाच्या विकासासाठी आ. रमेश बोरनारे, मा. आ.स्नेहलता कोल्हे यांचा शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू असतो.

Mypage

या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी घाट, भव्य डोमचे बांधकाम व या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्याचे काम शासनाच्या वतीने लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, ब्र. योगीराज सदगुरू गंगागिरीजी महाराज यांच्या त्याग व साधनेतून गोदावरी नदीकाठी निर्माण झालेल्या श्रीक्षेत्र सराला बेटाला फार मोठी परंपरा असून, या पवित्र धार्मिक स्थळाशी असंख्य भाविक-भक्त अनेक वर्षांपासून जोडले गेले आहेत.

Mypage

ब्र. योगीराज सदगुरू श्री गंगागिरीजी महाराज, ब्र. सदगुरू नारायणगिरीजी महाराज यांनी श्रीक्षेत्र सराला बेटाच्या माध्यमातून फार मोठे अध्यात्मिक कार्य केले आहे. योगीराज सदगुरू गंगागिरी महाराज हे महान संत होते. लोकांचे दु:ख व अज्ञान दूर करून त्यांना भक्तिमार्ग दाखविण्यासाठी त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. ‘लेने को हरिनाम, देनेको अन्नदान। तरने को लीनता, डुबने को अभिमान॥’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. ते स्वत: नेहमी याचे तंतोतंत पालन करीत असत.

Mypage

मा. मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचे श्रीक्षेत्र सराला बेटाशी अतिशय जवळचे नाते होते. वै. नारायणगिरीजी महाराजांशी त्यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. आजही कोल्हे परिवाराचे श्रीक्षेत्र सराला बेटाशी व मठाधिपती प. पू. रामगिरीजी महाराज यांच्याशी ऋणानुबंध कायम असून, प.पू. रामगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद कायम कोल्हे परिवाराच्या पाठीशी आहेत हे आमचे परमभाग्य आहे.  

Mypage

मठाधिपती प. पू. रामगिरीजी महाराज हे ब्र. सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज व ब्र. सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या कार्याची परंपरा उत्तम प्रकारे पुढे चालवत असून, अनेक वर्षांपासून ते कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत सुसंस्कृत समाज घडविण्याचे फार मोठे कार्य करत आहेत. त्यांच्या पुढाकारातून या ठिकाणी सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले आहे. आज या ठिकाणी ब्र. गंगागिरीजी महाराज व नारायणगिरीजी महाराज यांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन मी धन्य झाले.

Mypage

श्रीक्षेत्र सराला बेट येथे अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन व धार्मिक सोहळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या डोम, घाट तसेच या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यासाठी व अन्य विकास कामासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शासनाच्या वतीने भरीव निधी दिला आहे. त्याबद्दल सर्व भाविक-भक्तांच्या वतीने मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानते, असेही कोल्हे म्हणाल्या.

प्रारंभी संस्थानच्या वतीने महंत प.पू. रामगिरीजी महाराज यांनी मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे, स्नेहलता कोल्हे व अन्य मान्यवरांचे स्वागत केले. महंत प.पू. रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.