करंजी परिसरात वादळात बाधित झालेल्या कुटुंबांना अतितातडीची मदत मिळणार 

खासदर लोखंडे यांच्या तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना सुचना

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : कोपरगाव तालुक्यात मूलभूत समस्या उद्भवू नये म्हणून शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना सुचना करत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

करंजी ग्रामपंचायतचे उपसरपंच शिवाजी जाधव यांनी मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले असल्याचे सांगितले. पंचनामा झाला मात्र अद्यापही त्यांना मदत मिळाली नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खा लोखंडे यांनी दूरध्वनीवरून फोन करत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यामुळे करंजी परिसरातील करंजी पढेगांव शिंगणापूर येथील 35 ते 40 कुटुंबांना अतितातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.तहसीलदार भोसले यांच्यासह प्रभारी गट विकास अधिकारी जालिंदर पटारे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पशुसंवर्धन विकास अधिकारी श्रीमती काटे, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोळी यांना नागरिकांना मदत करण्याच्या सूचना केल्या. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, शिवसेना तालुकाप्रमुख रावसाहेब थोरात, जिल्हा संघटक शिवाजी जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवा लोखंडे, महिला तालुकाध्यक्ष मीनाक्षीताई वाकचौरे, विमलताई पुंडे, शिवसेना शहर प्रमुख अक्षय जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख अभिषेक आव्हाड, विनोद गलांडे अनिल नरोडे अदी उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी पुरवठा विभाग व रेशन दुकान चालक आपल्या मर्जीप्रमाणे रेशन दुकान चालवतात. रेशम कार्डात असलेल्या नावाप्रमाणे लाभार्थ्यांना रेशन मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत असल्याचे सांगितले.तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी सध्या जनावरांची चारा टंचाई ही जाणवणार नसल्याचे सांगितले. अजून पुढील 78 दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. 

खा. लोखंडे यांनी दूध उत्पादकांच्या बाबतीत अजूनही काही लोकांना अनुदान मिळाले नसल्याचे सांगत या संदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवत असल्याने तात्काळ पाणीटंचाई संदर्भात टॅंकरने पाणीपुरवठा करावा अशा सूचना करण्यात आल्या.पाटबंधारे विभागाच्या चाऱ्या दुरुस्ती करून पावसाळ्यातील ओव्हर फ्लो चे पाणी प्रत्येक बंधाऱ्यात अडवता आले पाहिजे अशी सूचना यावेळी खासदार लोखंडे यांनी केली.

ऑनलाइन रेशन संदर्भात अनेक समस्या उद्भवत असल्याचे सांगत रावसाहेब थोरात यांनी तात्काळ या समस्या सोडविण्यासाठी तहसीलदार व पुरवठा विभागाने प्रयत्न करावा असे सांगितले. शेवटी सर्वांचे आभार प्रभारी गट विकास अधिकारी जालिंदर पटारे यांनी मानले.