कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघ म्हंटले की, काळे-कोल्हे यांचा बालेकिल्ला. येथे काळे आणि कोल्हे यांची राजकीय ताकद सर्वाधिक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काळे व कोल्हे हे दोन्ही मातब्बर नेते एकाच विचार पक्षाच्या महायुतीमध्ये असल्याने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील एकतर्फी मताधिक्य मिळवून विजयी होतील असे वाटत होते.
शिवाय सोबतीला पालकमंत्री होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे अर्थात राज्य महानंद दूध संघाचे माजी अध्यक्ष राजेश परजणे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे माजी कट्टर हिंदूत्वासाठी कार्य करणारे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह अनेक दिग्गज एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला उध्दव ठाकरे यांना मानणारा निष्ठावंत शिवसैनिक व शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची शिवसेना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, केंद्रीय मंत्री व दलितांचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांची आरपीआय पार्टी, रासपसह अनेक घटक पक्ष हिंदुत्ववादी संघटनासह अनेक संघटाना एकञ लोखंडे यांच्या विजयासाठी प्रचार करीत होते. राजकीय पाठबळाची इतकी मोठी तफावत असुनही लोखंडे यांना संपुर्ण मतदार संघातून ७४ हजार ७५२ मते मिळाली त्यातुन केवळ ११ हजार ७२९ मतांची आघाडी मिळाली.
तर भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सचिव संदीप वर्पे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, यांच्यासह सर्वसामान्य सेनेचे सैनिक प्रचार करीत होते तरीही वाकचौरे यांना या मतदार संघातून ६३ हजार २३ मते मिळाली. यावरुन असे सिद्ध होते की, काळे कोल्हेसह अनेक दिग्गज लोखंडे यांच्यासाठी प्रचार करीत असले तरीही खासदार सदाशिव लोखंडे यांनी गेल्या दहा वर्षांत कोपरगाव मतदार संघात ठोस कोणतेही विकास कार्य केले नाही. जनतेशी कसलाही संपर्क ठेवला नाही. करोनाच्या संकट काळात खासदार म्हणून कोणतीही मदत केली नाही याचा राग सर्वसामान्य जनतेच्या मनात होता.
काळे कोल्हे यांच्या बद्दल मतदार संघात जनतेला सहानुभूती असली तरी लोखंडे यांच्याबद्दल चिड असल्याने मतदारांनी व काळे-कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे लोखंडेला विरोध करून वाकचौरे यांना पसंती दिली. म्हणुनच इतके दिग्गज नेते असुनही लोखंडे यांना अपेक्षित मताधिक्य कोपरगाव मतदारसंघातून मिळाले नाही. काही मतदारांना दोन्ही उमेदवार मान्य नव्हते म्हणून नोटाला मतदान केले, तर काहींनी उत्कर्षा रुपवते यांना मते दिली.
कोपरगाव मतदार संघातील जनतेने काही प्रमाणात काळे-कोल्हे यांच्या शब्दाला मान देवून लोखंडे यांना जड अंतःकरणाने मतदान केले. पण काही मतदारांनी वाकचौरे यांनी यापूर्वी ते खासदार असताना कोपरगाव मतदार संघातील धार्मिक स्थळांना भरीव खासदार निधी दिल्यामुळे त्यातुन उतराई म्हणून भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्ष पार्टी गट तट न पहाता मतदान केले आहे. लोखंडे यांच्याबद्दल असलेली नाराजी बहुतांश मतदारांनी मतदानातून व्यक्त करीत लोखंडे यांचा पराभव केला आहे. काळे-कोल्हे यांनी लोखंडे यांच्यासाठी प्रचार केला असला तरी मतदारांनी लोखंडे यांना अपेक्षित मतदान करून मताधिक्या वाढ दिली नाही.
संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदार संघात लोखंडे यांच्या प्रति कमालीची नाराजी होती. माञ स्थानिक नेते व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोखंडे यांना मते मिळाले अन्यथा एकतर्फी वाकचौरे यांचा विजय झाला असता. या निकालावरून काळे कोल्हे यांची चिंता वाढली आहे. जनता आपलं सांगूनही ऐकत नाही जनतेच्या मनाविरुद्ध उमेदवार दिला तर त्याला अपेक्षित मतदान मिळत नाही हे कोपरगाव करांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
दरम्यान नगरपालिका निवडणुकीत काळे कोल्हे यांच्या उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदासाठी विजय वहाडणे निवडणुकीत उभे होते तेव्हाही कोपरगावच्या जनतेने काळे कोल्हे ऐवजी वहाडणे यांना जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले होते. या लोकसभा निवडणुकीत काळे-कोल्हे एकञ आले तरीही लोखंडे ऐवजी वाकचौरे यांना बऱ्यापैकी मतदारांनी मतदान केले आहे. कोपरगावचे जावाई म्हणून वाकचौरे यांना येथील मतदारांनी मतदान केले आहे. काहीही झाले तरी काळे-कोल्हे यांच्या बालेकिल्ल्यात लोखंडे यांना तुलनेत अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही.