शेवगाव प्रतिनिधी, दि . ५ : निवडून आल्यानंतर मतदार संघाकडे झालेले दुर्लक्ष, भाजपाच्या काळात महागाईने गाठलेली परीसीमा, वाढती बेरोजगारी आणि जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाकडे भाजपचे झालेले दुर्लक्ष या प्रमुख कारणामुळे मोदी या चलनी नाण्याचा, मोठ्या प्रमाणात झालेल्या लक्ष्मी दर्शनाचा आणि राम लल्लाच्या आशीर्वादांचा प्रभाव या मतदारसंघात उपयोगी आला नाही.
महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या यंत्रणेपेक्षा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे यांची निवडणूक यंत्रणा सरस असतानाही सामान्य लोकांनीच ही निवडणूक सुरवाती पासून हाती घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे जिल्ह्यात दक्षिणेत तुतारी वाजली तर उत्तरेत मशाल पेटली.
राज्यात महाविकास आघाडीला यावेळी मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्ट झाले. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातही त्याचा प्रत्यय आला. मतदार संघात फारसे फिरकले नाहीत आणि सामान्यांनी केलेल्या संपर्काला त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यांचा मोबाईल सारखा नॉट रिचेबल असल्याचा प्रत्यय येई. येथील पिण्याचे पाणी, बायपास रस्ते, प्रलंबित बेलापूर परळी रेल्वे मार्ग अशा सुविधा देणे त्यांना सहज शक्य असतांनाही त्या मार्गी लागल्या नाहीत. या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे बद्दलच्या तक्रारी जाहीरपणे चर्चिल्या जात होत्या.
खा. डॉक्टर विखे पाटील यांची आणि स्थानिक कार्यकर्त्यांची नाळ जुळली नाही. भाजपच्या निवडणूक यंत्रणे इतकीच विखे यंत्रणा सक्षम असल्यामुळे त्यानी स्थानिक कार्यकर्त्यांशी जवळील साधली नाहीअशी चर्चा आहे. त्यातच भाजपचे अनेक निष्कावंत डावलले गेले. पक्षात बाहेरून येणाऱ्यांना सन्मान मिळाला. पक्षाचे हे धोरण सामान्याच्या पचनी पडले नाही. या मतदारसंघात लोकप्रतिनिधी आमदार मोनिकाताई राजळे शंभर टक्के त्यांच्या समवेत असतांना देखील
डॉक्टर विखेंना गट तटाच्या राजकारणाचा फटका बसला.
शेवगाव पाथर्डी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ज्येष्ठ नेते शरद पवाराबरोबर राहिला. मात्र खासदारकीच्या निवडणुकी पर्यंत तळ्यात मळ्यात करणाऱ्या स्थानिकांची भूमिका सामान्य मतदारांना भावली नाही. ज्येष्ठ नेते पवारांच्या झालेल्या या अवहेलनेमुळे महाविकास आघाडीला सामान्यांची सहानुभूती मिळाली. ही लंकेच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणावी लागेल. लंके यांनीही गेल्या पाच-सहा वर्षांपासून या परिसरात सामान्य मित्रमंडळी जमवीत त्यांच्या सुखदुःखाच्या, कौटुंबिक अडीअडीचणीच्या वेळी समक्ष भेटी देऊन मोठा गोतावळा निर्माण केला. शरदश्चद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांचे समवेत काढलेली जनसंवाद यात्रा, लाखो महिलांना मोहटा देवीचे वरचेवर दर्शन घडविले. ही त्यांच्या विजयाची साखर पेरणी ठरली.
महायुतीने सुरवाती पासून प्रचारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली होती. अनेकांच्या सभा झाल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मतदारसंघात येऊन जिल्ह्याच्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक गर्दीची सभा घेतली. मात्र त्यांनी विकास कार्याबद्दल न बोलता एका समाजा बद्दल केलेला उल्लेख न रुचल्यामुळे त्या समाजाची एकजूट झाली. तो ऐनवेळी दुरावला गेला. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
निलेश लंके हा सामान्य शिक्षकाचा मुलगा, विकास आणि सामाजिक कामात सातत्याने झोकून देणारा कार्यकर्ता म्हणून विशेषत: त्यांनी कोविड कालावधीत केलेले कार्य, तसेच सामान्यातल्या सामान्य चहाच्या टपरीवाल्यासी असलेली त्यांची जवळीक व सर्वांना केव्हाही सहजासहजी उपलब्ध होणारा हक्काचा माणूस अशी निर्माण केलेली ओळख त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली.