कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ एप्रिल २०२६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबवित पुष्पाताई अण्णासाहेब काळे यांनी भारतीय संविधानाची हस्तलिखित प्रत तयार करण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ नगरपरिषद वाचनालय येथे उत्साहात पार पडला असून यावेळी युवा नेते विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, सभापती संजना उदावंत, गटनेते प्रसाद आढाव यांच्यासह नगरपरिषदेमधील सर्व पदाधिकारी व नगरसेवक, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षिका म्हणून तब्बल ३६ वर्षांची प्रदीर्घ सेवा देत पुष्पा काळे यांनी गोदावरी वसाहत, पोहेगाव, कोळपेवाडी चासनळी, अकोले, रवंदे आणि मुर्शतपुर येथे विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. मुख्याध्यापक पदावरून त्यांनी सन्मानाने सेवानिवृत्ती घेतली. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबरोबरच साहित्य व अध्यात्मिक कार्यातही त्यांची विशेष ओळख आहे.

यापूर्वी त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’, ‘साई चरित्र’ आणि ‘संत तुकाराम गाथा’ यांसारख्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती तयार करून आपली लेखननिष्ठा सिद्ध केली आहे. आता भारतीय संविधान हस्तलिखित स्वरूपात साकारण्याचा त्यांचा संकल्प समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.पुष्पाताई काळे यांचा हा उपक्रम संविधानाविषयी आदर आणि जागरूकता वाढविणारा ठरणार आहे अशा शुभेच्छा युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिल्या.

यावेळी डॉ. अमोल अजमेरे, संदीप देवकर, संतोष गंगवाल, संजय उदावंत, कलविंदर दडीयाल, निसार शेख, ॲड. गणेश मोकळ, चंद्रकांत वाघमारे, राहुल खरात, राकेश काले, रोहित कनगरे, शैलेश नागरे, हेमचंद्र भवर आदींसह मान्यवर उपस्थित होते.


