पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले जनावराच्या टॅगिंगचे महत्व

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : शेवगाव येथील रविवारच्या आठवडे बाजारात आज पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनावरांच्या कानांना टॅगिंग करण्याचे महत्त्व शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांच्या भेटी घेऊन पटवून देत, टॅगिंग करून घेण्यासाठी प्रबोधन केले. विना टॅगिंग जनावरांची खरेदी-विक्री केल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची जाणीव करून दिली.

  यावेळी  सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एम बी कोते, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. मनोज शिंदे,  शेवगावच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. कल्पना पवार शिर्के तसेच डॉ. अनिकेत अरोळे पशुधन विकास अधिकारी फिरते पशुवैदकिय पथक पंचायत समिती शेवगाव या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन टॅगिंग – करण्याचे आवाहन केले.

  राज्यातील पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, तसेच जनावरांच्या जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तातरण करणे यामुळे सोपे होणार आहे. पशू व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने जनावरांच्या कानांना टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीवर त्याची नोंद करणे बंधनकारक असल्याची माहिती यावेळी दिली.