रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वंचितचे शहराध्यक्ष गर्जेंचा आंदोलनाचा इशारा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : शेवगावात सध्या सुरु असलेल्या पावसाने चोहो बाजूसह आंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. येथील भारत संचार निगम कार्यालया समोरून भारदे विद्यालयाकडे जाणारा रस्ता तर अत्यंत खडतर बनला असून येथे तर रस्ता पूर्णपणे खड्यात हरवला आहे. येथून रोज ये-जा करणाऱ्या हजारो विद्यार्थ्याना व नागरिकाना दूसरा पर्याय नसल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रितम गर्जे यांनी  आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नगर रस्ता ते भारदे विद्यालयासमोरून पंचायत समिती रस्त्याला जोडणाऱ्या या मार्गावर शिवम व सहयाद्री अशा दोन स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, लोकमान्य हॉस्पिटलसह अन्य दोन रुग्णालये, सिटीस्कॅन सारखे आधूनिक केंद्र, राष्ट्रीयीकृत बडोदा बँक व दोन पत संस्था या व्यतिरिक्त शहरातील पदभूषण बाळासाहेब भारदे कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालय तसेच अनेक व्यावसायिक व नागरी वसाहतही असल्याने या मार्गावर रोजच हजारो विद्यार्थ्याची व नागरिकांची वर्दळ सातत्याने चालू असते.

या रस्त्यात अगणित खड्डे असल्याने पायी चालणे देखील मुश्किल आहे. त्यातच आता पावसामुळे साचलेल्या चिखल मिस्त्रीत पाण्याची डबकी साचली आहेत. त्यामुळे येथून सर्कस करीत जावे लागते. अनेकदा अपघात होतात, येथून जाणाऱ्या येणाऱ्याचे मणके खिळखिळे होतात, वाहनांचे नुकसान होते. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या हजारो विद्यार्थ्याना व नागरिकांना दूसरा पर्यायी रस्ता नाही. तरीही नगरपरिषदेला जाग येत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा वंचितचे शहराध्यक्ष गर्जे यांनी दिला आहे.

आजारी व अत्यावस्थ रुग्णांना या मार्गाने रुग्णालयात येताना मोठा त्रास सहन करावा लागतो. वारंवार मागणी करुन देखील या मार्गाची दुरुस्ती वा  देखभाल केली जात नाही. हा मार्ग तातडीने दुरुस्त केला जावा.
                        डॉ. गणेश चेके
                 लोकमान्य रुग्णालय, शेवगाव