कोल्हे गटाच्या आणखी एक माजी नगरसेविका काळे गटात दाखल

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : लोकसभा निवडणुकीपूर्वी कोल्हे गटाच्या माजी उपनगराध्यक्षासह काही नगरसेवकांनी काळे गटात प्रवेश केला होता. त्यानंतरही कोल्हे गटाच्या नगरसेवकांचे काळे गटात इनकमिंग अजूनही सुरूच असून आणखी एका कोल्हे गटाच्या माजी नगरसेविकेने आ.आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात राजकीय भूकंप घडवून कोल्हे गटाला हादरा दिला होता. त्यावेळी माजी उपनगराध्यक्षासह काही माजी नगरसेवक काळे गटात आले आहेत. नुकताच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आटोपला असून आ.आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा कोल्हे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.

कोल्हे गटाच्या माजी नगरसेविका हर्षदा दिनेश कांबळे यांनी आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे कोपरगाव शहरात कोल्हे गटाला गळती लागली असून त्यांना मोठा हादरा बसला आहे. दुसरीकडे मात्र कोपरगाव शहरात काळे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

कोपरगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी २९०० कोटी निधी आणून केलेल्या विकासाच्या माध्यमातून मोठं वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीमध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग सुरु आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील सुजाण मतदारांनी विकासाला साथ देतांना आ.आशुतोष काळे यांना जनआशीर्वाद देवून मतदार संघाचे नेतृत्व पालटविले.

मिळालेल्या संधीचे सोने करतांना आ.आशुतोष काळे यांनी देखील आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेवून मतदार संघाचा सर्वांगीण विकास करून दाखवत मतदार संघावर आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे सातत्याने विरोधी पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असून हे पक्षप्रवेश आ.आशुतोष काळे यांची ताकद वाढविणारे ठरणार आहे. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहराचा केलेला विकास कोपरगावकरांना भावला आहे. अत्यंत महत्वाचा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करतांना ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी देवून त्यांनी या कामाला दिलेली गती पाहता हे काम लवकरच पूर्ण होवून कोपरगावकरांना नियमितपणे स्वच्छ पाणी मिळणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिला भगिनींची होणारी वणवण काय असते हे एक महिला म्हणून मला त्याची जाणीव आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या ते प्रश्न सोडविण्याची तळमळ व हातोटी असणाऱ्या नेतृत्वाचे हात बळकट व्हावे व मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहराचा देखील अधिकाधिक विकास व्हावा या उद्देशातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.-सौ. हर्षदा कांबळे (माजी नगरसेविका)