शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : शेवगाव विधानसभा मतदारसंघात पिण्याचे पाणी, पाट पाणी, वीज, रस्ते अशा प्रकारच्या अनेक मुलभुत समस्यांची तीव्रता कायम आहे. गेल्या दहा वर्षात नवीन काही झाले नाही. त्यामुळे मतदार संघाचे वाळवंट झाले आहे. विकास करायचा असेल तर आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी विधानसभेत आवश्यक आहे. त्यासाठी लोकांना एकीची वज्रमुठ बांधावी लागणार आहे. नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक लोकांनी हातात घेऊन ठिकठिकाणी परिवर्तन घडविले आहे. त्याप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणूक सुद्धा आपल्या प्रपंचाची निवडणुक समजून परिवर्तनासाठी सज्ज होण्याचे आवाहन माजी आमदार डॉ. नरेंद्र पाटील घुले यांनी येथे केले.
वाढदिवसाचे औचित्य साधून घुले बंधूच्या चाहत्यांनी डॉ. नरेंद्र पाटील घुले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे जाहीर आयोजन आज बुधवारी येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात केले होते यावेळी ते बोलत होते. श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत शांतिब्रम्ह आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी धनगर समाजाच्या वतीने त्यांना काठी व घोंगडी भेट देण्यात आली.
डॉ. घुले पुढे म्हणाले की, आपल्या हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत नसल्याने सर्वच क्षेत्रात शेवगाव मतदार संघाची अधोगती झाली. शासकीय, निमशासकीय कार्यालयात जनतेची अडवणूक सुरु आहे शेवगाव नगरपरिषदेत कारभाराची उलटी गंगा वाहत आहे. विद्यमान लोकप्रतिनिधीचा कामकाजावर वचक नसल्याने सामान्य माणसाची फरफट होत आहे. त्यामुळे लोकांनी आता शांत न राहता जागृत होणे आवश्यक आहे. आपल्या हक्काच्या माणसाला पाठबळ द्या. संधी दिली तर संधीचे सोने करू अशी ग्वाही देत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
शांतिब्रम्ह आदिनाथ महाराज शास्त्री यांनी समाजासाठी वाहून घेतलेल्या डॉ. नरेंद्र पाटील घुले यांचा सन्मान करण्याचे भाग्य आपणास लाभल्या बद्दल समाधान व्यक्त करून आज सर्वत्र अहंम भाव निदर्शनास येत आहे. बाप मुलाला विचारत नाही अशी स्थिती असतांना नरेंद्र पाटील व चंद्रशेखर पाटील या घुले बंधूचे राम लक्ष्मणा सारखे प्रेम असल्याने सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन करून घुले बंधूची इच्छ पूर्ण होओ असे शूभाशिर्वाद दिले.
माजी आमदार पांडूरंग अभंग, काकासाहेब नरवडे, बाळासाहेब ताठे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांची भाषणे झाली. त्या सर्वानी घुले बंधूनी आता अभिष्टचिंतना निमित्त आलेल्या हजारो कार्यकर्त्याच्या आंतरिक मनातील भावना विचारात घेऊन आगामी विधान सभेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरा समाज आपल्या बरोबर आहे अशी गळ घातली. आरोही डोईफोडे या लहान मुलीनेही नरेंद्र पाटलांना शुभेच्छा देऊन उपस्थितांना या निमित्ताने प्रत्येकाने एकेक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले, दिलीपराव लांडे, अरुण पाटील लांडे, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, ज्येष्ठ संचालक राजेंद्र दौंड, संजय फडके, रामनाथ राजपुरे, देसाई देशामुख, कल्याण नेमाणे, बंडू पाटील बोरुडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष नंदु मुंढे यांचेसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संजय कोळगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले दिपक कुसळकर यांनी सुत्रसचलन केले तर ताहेर पटेल यांनी आभार मानले.
यावेळी उपस्थित माजी आमदार पांडूरंग अभंग, बाळासाहेब ताठे, काकासाहेब नखडे, संजय कोळगे या प्रमुख वक्त्यांनी २०२४ ची विधानसभा निवडणूक तुमच्या साठी नव्हे तर आमच्यासाठी, सामान्य लोकांसाठी लढण्याची गळ घालत दिवस थोडे राहिले असल्याने उमेदवार सुद्धा जाहीर करून टाका असे जाहीर आवाहन केले. डॉ नरेंद्र पाटलांनी मात्र आपण वज्रमुठ बांधा संधी द्या. संधीचे सोने करू सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असे जाहीर करत उमेदवार, पक्ष व चिन्ह स्पष्ट न करता गुलदस्त्यात ठेवले.