इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद
कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबर अनेक क्षेञात विक्रम केले त्यात वर्षभर सुर्य नमस्कार योगा करून नवा उच्चांकी विक्रम करीत थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव कोरण्याचा विक्रम केला आहे.
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित, आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलातील ७२०० विद्यार्थी व शिक्षकांनी दररोज १२ सूर्यनमस्कार केले. या प्रमाणे २१ जून २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत २ कोटी ४७ लाख ९९ हजार ६९२, सूर्यनमस्कार पूर्ण केले असून या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली आहे. या विक्रमा बाबतची अधिकृत उदघोषणा आज जागतिक योग दिनाच्या दिवशी एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी अशोक आदक यांनी केली. आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात आडीज कोटी सुर्य नमस्कार संकल्प पुर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात केली.
या दोन्ही विक्रमाची नोंद झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह यावेळी अधिकारी अशोक आदक यांनी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाला बहाल केले. यावेळी आत्मा मालीक ध्यान पिठाचे संत परमानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज, संत मांदियाळी, आत्मा मालिक ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, विष्णुपंत पवार, प्रभाकर जमधडे, विठ्ठलराव होन, जाधव भाई पावसिया आत्मा मालिका शैक्षणिक संकुलाचे प्रमुख सुधाकर मलिक आदि मान्यवर उपस्थित होते.
या विक्रमा बद्दल बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले की, केवळ सुर्यनमस्काराचा विक्रम करण्यासाठी हे केले जात नाही तर जीवनामध्ये परमात्मा परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर निरंतर ध्यानाची आवश्यकता आहे. ध्यानामध्ये एकाग्रता हवी असेल तर प्रथम योगाची आवश्यकता आहे त्या योगामध्ये योगाचा राजा म्हणजे सुर्य नमस्कार आहे म्हणुन आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील विद्यार्थांनी अवघ्या १० महिन्यात तब्बल अडीच कोटी सुर्य नमस्काराचा विक्रम देशात आणि आशियात केला. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आणि सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान, विक्रम सद्गुरू आत्मा मालिक जंगलीदास माऊली व संत दशरतानंद महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. एका चांगल्या विचारांच्या माध्यमातून सद्गुरू माऊलींनी दिलेले आत्मतत्त्वाचा हा संकल्प आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी निरंतर सातत्य ठेवून सुर्यनमस्काराचा हा विक्रम केला.
आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये अध्यात्मिक संस्काराबरोबरच ध्यान, योग, सूर्यनमस्कार यांच्या माध्यमातून शरीर व मनाच्या सुदृढतेसाठी कार्य केले जाते. हाच संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा यासाठी सर्व विद्यार्थी दररोज ध्यान करतात. त्यांच्या शरीर सुदृढतेसाठी सूर्यनमस्कार हा उपक्रम वसतिगृह दैनंदिनीमध्ये सामाविष्ट करण्यात आला. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून संकुलातील विद्यार्थी व शिक्षक यांचे माध्यमातून २१ जून २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत २.५ कोटी सूर्यनमस्कार पूर्ण करण्याचा संकल्प सोडला असेही ते म्हणाले.
आज रोजी प्रत्यक्षात २.५ कोटीपेक्षा जास्त सूर्यनमस्कार पूर्ण झाले असून हा उपक्रम यापुढे कायमस्वरूपी असाच सुरु राहणार आहे. संकुलातील विद्यार्थ्यांनी केलेल्या जास्तीत जास्त सूर्यनमस्काराची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली, याचा मनस्वी आनंद तसेच अभिमान आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये वसुंधरा संवर्धनासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिळून एक लाख वृक्ष लागवड व संगोपनाचा यावेळी त्यांनी संकल्प सोडला.
यावेळी राष्ट्रीय ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज म्हणाले की, या आत्मा मालिक ध्यान पिठ तथा वैष्वीक पिठाचे प्रणेते आत्मा मालिक जंगलीदास माऊली हे अष्टांग अवलिया आहेत. त्यांच्या विचारांची शिकवण आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात शिकणारे सर्व विद्यार्थी ध्यान व योगाचे साधक आहेत. येणाऱ्या भविष्य काळात भारतातील नवीन युवक हा आखिल विश्वाला दिशा देणारा ठरणार आहे. शालेय अभ्यासाबरोबर ध्यान व योग अभ्यासामुळे त्यांच्या व्यक्तिगत व राष्ट्रीय जीवनाला शाश्वत दशा आणि दिशा मिळावी म्हणून वर्षभर आडीज कोटी सुर्य नमस्काराचा संकल्प केला तो विक्रमी ठरला. या विक्रमाची नोंद आशियामध्ये झाली या बद्दल त्यांनी संकुलाचे प्रमुख अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी व सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स चे अधिकारी अशोक आदक यांनी आत्मा मालिक संकुलाच्या संपूर्ण प्रणालिचे व व्यवस्थापनाचे कौतुक केले. आजपर्यंत कोणीतीही संस्था , शैक्षणिक संकुलाने थेट आडीज कोटी सुर्य नमस्कार केले नाही तेही एकाच वेळी ७ हजार २०० विद्यार्थ्यांनी तर मुळीच नाही. हा मोठा विक्रम असल्याने आत्मा मालिक संकुलाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रमी नोंद करुन त्यांचा सन्मान केला आहे असेही ते म्हणाले.
दरम्यान आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थांनी घेतलेल्या संकल्पाची पुर्ती झाली त्याचबरोबर जास्तीत जास्त सूर्यनमस्कार केल्याचा विक्रमाची नोंद झाली. यामुळे आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संकल्पपूर्तीसाठी शालेय व्यवस्थापक सुधाकर मालिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल, सर्व प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह शिक्षक यांनी परिश्रम घेतले.