पाच वर्षापासून नाथांच्या पालखी मार्गात दगड-धोंडे अन चिखल

पैठण-पंढरपूर पालखी मार्गाची दूर्दशा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : तालुक्यातून जाणाऱ्या पैठण -पंढरपुर (पालखी मार्ग)  या  राष्ट्रीय महामार्गाचे पाच वर्षापासून काम रखडले आहे. पंढरीच्या पांडूरंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविक संताच्या पालखी सोबत पायी ग्यानबा तुकारामचा गजर करित नाचत, गाजत, फुगड्या खेळत, रिंगण धरून हरिनामाचा जप करित पायपीट करित दरवर्षी आषाडी एकादशी ला पंढरपुरात दाखल होत असतात.

राज्यातल्या महत्वाच्या पालख्यापैकी श्री संत एकनाथ महाराजाची पालखी २८ जुन रोजी पैठण येथुन पंढरपुरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखीत लहानमोठ्या शेकडो दिंडया सहभागी होतात. नाथांच्या पालखी सोहळ्यात पायी पंढरपुरला जाण्याचे ज्याला भाग्य लाभते तो नशिबवान वारकरी समजला जातो. अशा हजारो वारकऱ्यांना सोबत घेवुन नाथांच्या पालखीचा वैष्णवांचा मेळा ज्या रस्त्याने पंढरपुरकडे जाणार आहे. त्या रस्ताची अवस्था अत्यंत खराब आणि बिकट झाली आहे. ही दिंडी शेवगांव तालुक्यातील मुंगी, हातगांव, बोधेगांव, लाडजळगांव, शेकटे मार्गे पंढरपुरकडे रवाना होते.

पंढरीच्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त आणि नुकताच ज्यांचा केंद्रीय मंत्रीमडळात तिसऱ्यांदा देशाचे रस्ते वाहतूक मंत्री म्हणून समावेश झालेला आहे. असे ना. नितीन गडकरी यांनी वारकऱ्यांचा पायी प्रवास सुखकर व्हावा या पवित्र हेतून पैठण ते पंढरपुर (पालखी मार्ग) राष्ट्रीय महामार्गाची (७५२ ई ) पाच वर्षापूर्वी निर्मिती केली. त्यासाठी मोठा निधी मंजुर केला. पण दुर्दैवाने पाच वर्षात या रस्ताचे काम पुर्ण होवू शकले नाही. गेल्या दोन वर्षापासून काम बंद आहे. शेवगांव तालूक्याच्या हद्दीतील अर्धवट रस्त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही भागात रस्त्यावर दोन वर्षापूर्वी नुसतीच खडी अंथरूण ठेवली असल्याने पायी चालणे अवघड झाले आहे. वारकऱ्यांचे पाय अशरक्षः रक्तभंबाळ होतील अशी परिस्थिती आहे.

तर नुकत्याच झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्यात मोठेमोठे चिखल मिश्रीत पाण्याची डबकी बनली आहेत. ‘नाथांच्या पालखीचा हा भक्त मेळा संभाजीनगर, अहमदनगर, बीड व सोलापूर या चार जिल्ह्याच्या हद्दीतून १९ मुक्काम करून २० व्या दिवशी म्हणजे आषाडी एकादशीच्या एक दिवस आगोदर पंढरपुरात दाखल होतो. चनकवाडी, हातगाव, कुंडल  पारगाव, मुंगसवाडे, राक्षसभुवन, रायमोह, पाटोदा, दिघोळ, खर्डा, दांडेगाव, अनाळे, परांडा, बिटरगाव, कुर्डू, आरण,करकंब, होळे, शिराढोण या १९ ठिकाणी मुक्काम करून हा पायी पालखी सोहळा पंढरपूरात दाखल होणार आहे.

  ना. नितिन गडकरी यांनी ज्या उदात्त हेतुन या पालखी माहामार्गाची निर्मिती केली त्या हेतूला या महामार्गाचे ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी वाटण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. यंदा ही वारकऱ्यांसाठी या मार्गावरील पायपीट दुखःदायक आहे. निदान ज्याज्या ठिकाणी खडी उखडी आहेत तेथील खडी बाजुला सारून पायी जाणऱ्या भक्तांसाठी रस्ता करावा आणि ज्या ठिकाणी पाण्याचे डबके साचुन रस्त्याचे गटार झाले आहे तेथे पर्यायी रस्ता करावा अशी मागणी वारकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या पालखीच्या रथास जी बैल जोडी असते ती शेवगाव तालुक्यातील हातगाव येथल डॉ.निलेश श्रीनिवास मंत्री यांची असून ते तिसऱ्या पिढी पासून रथास बैल जोडी देण्यासाठी मानकरी ठरत आहेत. पैठण येथून निघणाऱ्या पायी पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सूरू आहे.