आव्हाण्याच्या स्वयभू श्री गणेशाचा आज अंगारखी यात्रोत्सव

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : तालुक्यातील श्री क्षेत्र आव्हाणे  येथील स्वयंभू श्री गणेश देवाचा अंगारखी यात्रोत्सव आज मंगळवारी (दि. २५) मोठया उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा होत आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गोरडे व देवस्थानचे अध्यक्ष प्रा. मालोजीराव भुसारी यांच्या हस्ते आज सकाळी ७ ला  स्वयंभू श्री गणेश देवाला गंगा जलाने स्थान व अभिषेक घालण्यात आला आहे त्यानंतर सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या काळात आळंदीच्या ज्ञानदा संस्कृत प्रबोधिनीचे प्रवर्तक वे.शा.सं. डॉ. गोरक्षनाथ उदागे महाराज यांचे कीर्तन होणार आहे तर सायंकाळी सातला निलेश सातपुते, पारस कर्नावट, निलेश शिरसाट, पंकज गांधी, श्रेयस चोरडिया, दीपक बाफना या भाविकांच्या हस्ते आरती व महाअभिषेक होणार असून रात्री पंचक्रोशीतील दादोबा देव एकतारी भजनी मंडळाचे जागर होणार आहे.

यात्रे निमित्त परिसर सुसज्य झाला असून खाऊ, खेळणी, कटलरी अशा प्रकारची विविध दुकाने लागली आहेत. भाविकांसाठी  दिवसभर फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी भाविक भक्तांनी उपस्थिती लावून श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने केले आहे.