शेवगाव नगरपरिषदेत कागदावर वजन ठेवल्या शिवाय काम पुढे सरकेना

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : शेवगाव नगरपरिषदेचा कारभार सध्या अत्यंत गलथान पद्धतीने सुरू आहे, नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही, तशात नगरपरिषदेचे कार्यालय गावापासून दीड किलोमीटरवर नेण्यात आले असल्याने कर्मचाऱ्यावर कोणाचे नियंत्रण राहिले नाही. नागरिकांची कामे होत नाहीत, कामचा कागद वजन ठेवल्या शिवाय पुढे सरकत नाही, अशा नागरिकांच्या अनेक तक्रारीआहेत. एका नागरिकाच्या तक्रार निवारणार्थ माजी नगरसेवक उमर शेख नगरपरिषदेत गेले असता त्यांना धक्काच बसला.

प्रभागातील अमीर शेख यांच्या घराची घरपट्टी तब्बल पाच लाख ९५ हजार ६९८ रुपये आकारण्यात आली असल्याने ही घरपट्टी एवढी कशी हे जाणून घेण्यासाठी ते नगरपरिषद कार्यालयात गेले असता. ती तेवढी का ? हे समजून सांगण्या ऐवजी केलेली आकारणी बरोबर असून तुम्हाला ती कमी करून हवी असेल तर  तुम्हाला माझ्याशी पैशाची तोडपाणी केली तर मी तुम्हाला हे बिल कमी करून नील दाखला व या मिळकतीचा नगरपालिका उतारा देऊ शकतो अन्यथा या बिलात कोणतीही तडजोड होणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले.

त्यामुळे संतप्त माजी नगरसेवकाने प्रभारी मुख्याधिकाऱ्याकडे  तोडपाणी करण्याची मागणी करणाऱ्या तुर्रबअली शौकतअली सय्यद या उद्धट कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी करणारे निवेदन दिले असून अन्यथा कोणत्याही क्षणी नगरपरिषदे विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

      या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनानुसार अमीर शेख यांना आलेल्या घरपट्टी रकमेबाबतच्या नोटीस नुसार त्यांचेकडे दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत होणारी पट्टी तीन लाख ९ हजार ११५ रुपये व त्यावर दोन हजार २१८ रुपये वार्षिक कर अधिक इतर कर ४१८ रुपये असा एकूण वार्षिक कर दोन हजार ६३६ रुपये होतो. या घरपट्टीच्या होणाऱ्या एकूण रकमेवर दोन लाख ८३ हजार ७५३ व्याजाची आकारणी करून पाच लाख ९५ हजार ६९८ रुपये  एकूण  घरपट्टीच्या वसुलीची नोटीस पाठविण्यात आली आहे.

वास्तविक ही मिळकतच ४ मार्च १९८० मध्ये विकत घेतली असून त्याचवेळी ग्राम पंचायतीकडे जागेची नोंद लावण्यात येऊन या मिळकतीचे ग्रामपंचायत काळातील सर्वसाधारण कर भरून नियमित केले आहे. त्यावरती ग्रामपंचायत काळातील कोणत्याही प्रकारची कर बाकी नाही. शेवगाव नगरपरिषदेची स्थापना २०१५ मध्ये झाली याचा अर्थ असा की आकारण्यात आलेली जवळपास तब्बल सहा लाखाची घरपट्टी फक्त ९ वर्षाची कशी होऊ शकते ?

  हीच बाब संबंधित व्यक्तीच्या निदर्शनास आणून देत असताना त्याने काहीही ऐकून व समजून घेण्याची मानसिकता न दाखवता अत्यंत असभ्य वर्तन केले.  २६ जून रोजी नगरपरिषद कार्यालयात त्याने जोरजोरात ओरडून जर तुम्ही माझ्यासी तडजोड करत असाल तर हे बिल कमी होईल. अन्यथा हे बिल कमी होणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा. हे जोर जोरात ओरडून अनेकदा सांगितले असल्याचा मालमत्ता धारक अमर शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा दावा असून हे ग्रामस्थ आता इरेला पेटले आहेत. 

त्यांच्या प्रभागाचे माजी नगरसेवक उमर बशीर शेख यांनी संबंधित कर्मचारी तुर्रबअली शौकतअली सय्यद याचे थेट निलंबनाची मागणी केली असून अन्यथा  न सांगता कोणत्याही क्षणी नगरपालिका परिषदे विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अमर शेख यांनी माहिती अधिकारात या दिवसाचे नगरपरिषद कार्यालयातील सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजची मागणी केली आहे.

दरम्यान या प्रकरणी प्रभारी मुख्याधिकारी लांडगे यांनी अशा पध्दतीने कामकाज करुन नागरिकांना वेठीस धरणा-या संबंधीत कर्मचा-याचा मालमत्ता विषयक कर आकारणीचा पदभार काढून त्यास अन्य काम दिले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी लांडगे यांचेसी अनेकदा दूरध्वनीवर संपर्क साधूनही त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.