बहिणींचा सन्मान प्रत्येक गावातच व्हावा – ॲड. नितीन पोळ 

कोपरगाव  प्रतिनिधी, दि.४ : नुकतीच महाराष्ट्र शासनाने आगामी विधानसभा डोळ्या समोर ठेऊन बहिणीचा सन्मान म्हणून माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली असुन महिला भगिनींना कागद पत्रे जमा करण्यासाठी होणारी धावपळ लक्षात घेता प्रशासनाने ही योजना राबविताना गावपातळीवर सुविधा उपलब्ध करून बहिणीचा सन्मान गावातच करावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ॲड नितीन पोळ यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. 

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली असुन या योजनेचा लाभ महिलांना होणार असुन प्रत्येक महिलांच्या खात्यात दर महा १५००/- ₹ देणार आहे त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसांत राज्यभर आवश्यक कागद पत्रे जुळवा जुळव करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली आहे.

राज्याच्या महसूल यंत्रणेकडे मतदार म्हणुन सर्व वयोगटातील महिलांची नोंद आहे त्याच प्रमाणे गाव पातळीवरील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांच्याकडे गावातील सर्व महिलांची व त्यांच्या आर्थिक बाबी घर गाडी यांची नोंद आहे, तलाठी यांच्याकडे शेतीची नोंद आहे. बरीच कागद पत्रे गावात मिळणार आहे असे असले तरी तालुक्यातील सर्व तहसील कार्यालयात महिलांची गर्दी दिसत आहे. 

विशेष म्हणजे सद्या शाळा महाविद्यालय प्रवेशाची गडबड आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची देखिल आवश्यक कागद पत्रे वेळेत मिळावी म्हनून धावपळ सुरू आहे असे असताना शासनाने ही योजना जाहीर करून महिलांना कागद पत्रे मिळावी म्हणून धावपळ करावी लागते त्यामुळे महसूल यंत्रनेवर ताण येत आहे सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत आवश्यक कागद पत्रे मिळत नाही. त्यामुळे महसूल यंत्रणेने माझी बहिण योजना राबविताना गावपातळीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तर अनेक प्रश्न मार्गी लागतील असे या पत्रकात म्हटले आहे.