शेवगावमध्ये डिसेंबर २०२४ मध्ये पक्षीमित्र संम्मेलनाचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व येथील न्यू आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय  यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या डिसेंबर मध्ये  “पक्षीमित्र” संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या नियोजनार्थ आज मंगळवारी महाविद्यालयात कृषक समाजाचे राज्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार बापूसाहेब भोसले यांचे उपस्थितीत नियोजन समितीची प्राथमिक बैठक पार पडली. 

यावेळी संमेलनाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत येत्या डिसेंबरच्या २८ व २९ तारखा  निश्चीत करुन पक्षी संवर्धन जनजागृती कशी करावी, तालुक्यातील विद्यार्थ्यांना, वन विभागाला आणि पंचक्रोशीतील शैक्षणिक संस्थांना या संम्मेलनात निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले. तसेच यानिमित्ताने महाविद्यालयात कायम स्वरूपी आर्ट गॅलरी निर्माण करावी आणि किमान एखाद्या पक्षावर डॉक्युमेंट्री करण्याचे निश्चित करण्यात आले.

अधिवेशन काळात विविध पक्षांचे आकर्षक फोटो प्रदर्शन भरविण्याचे तसेच महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना शेवगाव शाखेच्या वतीने जीवन गौरव स्वरूपाचे किमान चार पुरस्कार देऊन संबंधितांना सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी किमान साडेतीनशे शिबिरार्थी संमेलनात सहभागी होतील असे गृहीत धरून त्यांच्या निवास आणि भोजन व्यवस्थेवर देखील चर्चा झाली.    

या संदर्भात  जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी  पुढील बैठकीत समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कूंदे,  प्रा.जनार्दन लांडे पाटील, डॉ. संजय लड्डा,  बाळासाहेब भालेकर, ज्ञानेश्वर कातकडे, ज्ञानेश्वर गोसावी, डॉ. रवींद्र वैद्य, प्रा. भाऊसाहेब अडसरे, डॉ. उषा शेरखाने, प्रा. प्रिया नरवडे, प्रा. वृषाली फुलारी आणि प्रा. गायत्री लांडे यांची उपस्थिती होती.