दहिगाव ने पायी दिंडीचे शेवगावमध्ये स्वागत

शेवगाव प्रतिनिधी, दि . ७ : पंढरपुरला निघालेल्या तालुक्यातील दहिगाव ने येथील दधनेश्वर शिवालयाच्या पायी दिंडीचे भावी निमगाव, शहर टाकळीसह शेवगाव येथे स्वागत करण्यात आले. शुक्रवारी दिंडी  दहिगावने हून निघून शेवगावी मुक्कामी आली. वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णदेव महाराज काळे यांनी सुरू केलेल्या तसेच वैकुंठवासी गुरुदास नवनाथ महाराज काळे यांनी यशस्वीरित्या जपलेल्या दिंडीचे हे २३ वे वर्ष आहे.

यंदा दिंडी चालक  हभप सुदाम महाराज शास्त्री, नरसिंग महाराज मुकुटकर, सिताराम महाराज चेडे, मोहन महाराज खंडागळे, मृदुंगाचार्य वैभव महाराज ठोंबरे, श्रीराम महाराज चव्हाण, गायनाचार्य निलेश महाराज नेवल, गोरक्ष महाराज मिरजे, माजी सरपंच सुभाष पवार आदींसह परिसरातील विविध गावचे भावीक पंढरीच्या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

दिंडीचे शहर टाकळी येथे सनई चौघडा व ढोल ताशाच्या गजरात ग्रामस्थांनी स्वागत केले. लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्यगीते सादर करीत दिंडीतील वारकऱ्यांची मने जिंकली.

     शेवगावी  पद्म लॉन्स कार्यालयात दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले. बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष बापूसाहेब गवळी, डॉ. हरिश्चंद्र गवळी, डॉ. गणेश शेळके, गणेश बोरा, विठ्ठल थोरात, रोहित मोरे, दीपक बेळगे, राधाकिसन गवळी, द्वारकानाथ  बिहाणी, बाजार समितीचे संचालक मनोज तिवारी, राम सारडा, यांच्यासह मार्केट यार्ड वरील भुसार व कांदा व्यापारी यांनी सुदाम महाराज शास्त्री सह दिंडीतील सहभागी भाविकाचे स्वागत केले. यावेळी परिसरातील भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री हरिपाठ व हभप शास्त्री महाराजांचे कीर्तन झाल्यानंतर भोजन झाले. पहाटे ४ला काकड आरती व चहापान करुन दिंडी पुढे मार्गस्थ झाली.