शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : ई- पिक पाहणी करुन सुध्दा हजारो शेतकऱ्यांची नावे ई- पिक पाहणीच्या यादीत नसल्यामुळे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ई – पिक पाहणी अट रद्द करून सरसगट अनुदान देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी केली आहे.
अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नसल्यामुळे किंवा छोटा मोबाईल असल्यामुळे. ई -पीक पाहणी करता आली नाही. अनेक शेतकऱ्यांना ई -पीक पाहणी ऑनलाईन कशी करायची याची माहिती सुद्धा देण्यात आली नाही. त्यामुळे महसुली गावातील शेतकरी या यादीत आले नसल्या बाबत शेतकऱ्यांना सरकारने ई पीक पहाणी अट रद्द करून सरसकट अनुदान मंजूर करावे असे लेखी निवेदन फुंदे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. तहसील, कृषी अधिकारी यांना दिले आहे.
तलाठी कार्यालयाने अनेक ई पाहणी ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांची पेऱ्याची नोंद न केल्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानापासून राहावे लागणार आहे. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीकाच्या अनुदानासाठी शासनाने ऑनलाईन ई पीक पेऱ्याची अट घातली आहे. परंतु शेतकरी त्यांच्या कापूस व सोयाबिन पिकांची ऑनलाइन नोंदणी करू शकले नाहीत.
सन २०२३ या हंगामात ई पीक पेरा नोंद केलेल्या शेतकऱ्यांनाच शासनाच्या अनुदानासाठी पात्र ठरविले जात असून ऑनलाइन नोंदनी न केलेल्या शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन शेतात असताना सुद्धा शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे अन्यथा या शेतकऱ्यां सह आंदोलन करण्यात येईल असा इशारा फुंदे यांनी दिला आहे.