श्री जगन्नाथ रथ यात्रेत सहभागी होत आमदर काळेंनी केले पूजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : संपूर्ण देशात धार्मिक सणाप्रमाणे काढण्यात येणारी श्री भगवान जगन्नाथ यात्रा प्रथमच कोपरगावमध्ये काढण्यात आली होती. या रथ यात्रेत आ. आशुतोष काळे यांनी सहभागी होवून श्री भगवान जगन्नाथाचे पूजन करून आशिर्वाद घेतले.

ओरिसा राज्यातील जगन्नाथ पुरी येथे मागील कित्येक शतकापासून भगवान श्री जगन्नाथाची रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे दरवर्षी लाखो भाविक येतात. परंतु जगन्नाथ पुरी येथे प्रत्येक व्यक्ती जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय कृष्णा भावनामृत संघ इस्कॉन कोपरगाव यांच्यावतीने श्रीमान सुंदर चैतन्य प्रभुजी व श्री लक्ष्मीनारायण दास यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात येवून हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री. भगवान जगन्नाथाची भव्य रथ यात्रा काढण्यात आली होती.

रविवार (दि.०७) रोजी भगवान श्री जगन्नाथाची महाआरती करून हि रथ यात्रा तहसील कार्यालय, भाजी मार्केट मैदान, गुरुद्वारा रोड, विघ्नेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारक या मार्गाने काढण्यात आली. भगवान जगन्नाथ, भगवान बलदेव आणि माता सुभद्रादेवी यांच्या मूर्ती विराजमान असलेल्या रथाला फुलांसह रंगीबेरंगी वस्त्रांनी केलेली सजावट पाहून भाविकांना जगन्नाथ पुरीच्या मुख्य रथ यात्रेच्या सोहळ्यात उपस्थित असल्याची अनुभूती येत होती.

यावेळी आ. आशुतोष काळे यांनी देखील या रथ यात्रेत सहभागी होवून भगवान जगन्नाथाचा रथ ओढला. श्री भगवान जगन्नाथाचे पूजन करून आशिर्वाद घेतले व आपली कृपा दृष्टी मतदार संघातील जनतेवर कायम रहावी अशी भगवान श्री जगन्नाथाच्या चरणी प्रार्थना केली.