मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४१.५१ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील मंजूर, चास, हंडेवाडी, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावांच्या शेतीसाठी वरदान ठरलेला कोल्हापूर टाईप बंधारा तीन वेळेस वाहून गेल्यामुळे शेती व शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आले होते. याची जाणीव असलेल्या आ.आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या बंधाऱ्याचे शाश्वत व टिकाऊ काम करण्यासाठी निधी देणार असल्याचा शब्द मंजूर बंधाऱ्याच्या लाभधारक क्षेत्राच्या गावातील नागरिकांना दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी निवडून आल्यापासून त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्या प्रयत्नांची अखेर महायुती शासनाने दखल घेत या मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल ४१ कोटी ५१ लक्ष निधीस प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.  

कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील मंजूर, चास, हंडेवाडी, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असलेला मंजूर येथील कोल्हापूर टाईप बंधारा २००५, २०१७ व २०१९ मध्ये वाहून गेल्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे व शेतकऱ्यांचे भवितव्य अंधकारमय तर झाले होतेच परंतु त्याचबरोबर भू-गर्भातील पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात खालावली जावून शेती सिंचनाचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यामुळे या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्राच्या गावातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवून देणार असल्याचे सांगितले होते. त्या दृष्टीने सातत्याने जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करून या बंधाऱ्याचे माती परीक्षण करून डिझाईनचे काम (प्रारूप आराखडा) पूर्ण करून घेत अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाला देखील आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून गती मिळाली होती.

तीनदा वाहून गेलेला, भौगोलिक परिस्थितीचे आव्हान व दुरुस्तीच्या कामाचे स्वरूप मोठे असतांना देखील आ. आशुतोष काळेंनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४१.५१ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता मिळविली आहे. त्यामुळे निश्चितच मंजूर, चास, हंडेवाडी,धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावातील शेतकऱ्यांमध्ये  समाधानाचे वातावरण पसरले आहे.

मागील अनेक वर्षापासून तीन वेळा वाहून गेलेल्या मंजूर बंधाऱ्याचे शाश्वत काम व्हावे अशी अपेक्षा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनी मंजूरचा कोल्हापूर टाईप बंधारा पुन्हा उभा राहील हि अपेक्षाच सोडून दिली होती. मात्र आ. आशुतोष काळेंच्या भगीरथ प्रयत्नांनी या शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा जिवंत झाल्या आहेत. त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी महायुती शासनाचे मंजूर, चास, हंडेवाडी,धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.

तीन वेळेस वाहून गेलेल्या मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्ती कडे दुर्लक्ष होत गेल्यामुळे आपल्याला कोणी वालीच राहिला नाही अशीच काहीशी परिस्थिती लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची झाली होती. मात्र जनतेच्या प्रश्नांची जाणीव व सोडविण्याची तळमळ असणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण करून मंजूर बंधाऱ्यासाठी निधी दिला. त्याच बरोबर राज्य मार्ग०७ वरील शहाजापूर ते सात मोऱ्या जिल्हा हद्द या रस्त्यासाठी १० कोटी निधी दिला असला तरी यावर समाधान न मानता या राज्य मार्ग ०७ देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्यासाठी तब्बल २३२ कोटी निधीस आ.आशुतोष काळे यांनी मंजुरी मिळविली आहे. मा.आ.अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील त्यांच्या कार्यकाळात दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी मोठ-मोठे पूल बांधले त्यामध्ये चास नळी येथे देखील गोदावरी नदीवर पूल बांधून महत्वाचा प्रश्न सोडविला व सर्वच शासकीय इमारती पूर्ण केल्या. त्यांच्या कामाची चुणूक उभ्या महाराष्ट्राने पहिली.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आ.आशुतोष काळेंनी एकाच पंचवार्षिक मध्ये विकासाचा अनुशेष भरून काढतांना सर्वच महत्वाचे प्रश्न सोडविण्याची अजोड कामगिरी करून दाखवत पश्चिम भागासह कोपरगाव शहर व मतदार संघाला न्याय देवून विकासाचे प्रश्न सोडविण्यात आ. आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. – सोमनाथ चांदगुडे. (माजी भाजपा तालुकाध्यक्ष)