शेअर ट्रेडींग मध्ये एकाला २० लाखाचा गंडा

शेवगाव  पोलिसात झाला गुन्हा दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ :  शेअर ट्रेडींग मध्ये चांगला परतावा देतो असे सांगून वीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीघा भावा विरोधात, येथील कापड दुकानदार गणेश भगवान हनवते यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन शेवगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा फसवणूक प्रकरणी दाखल झालेला हा दुसरा गुन्हा असून आता असे गुन्हे दाखल होण्याची मालिकाच सुरु होण्याची शक्यता आहे.

हनवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कमलेश विजय सिसोदिया, निलेश विजय सिसोदिया तसेच संदेश विजय सिसोदिया ( रा. आर्यन निवास, खंडोबानगर, शेवगाव )  या तीन सख्ख्या भावंडांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीच्या दुकानात जाऊन कमलेश सिसोदिया याने शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग सुरु केली आहे. चांगला नफा, परतावा मिळवून देईल असे सांगून फिर्यदीचा विश्वास संपादन केला. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन फिर्यादीने २ मे ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन, फोनपे तसेच चेक द्वारे वेळोवेळी १२ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

त्यानंतर निलेश विजय सिसोदिया, संदेश विजय सिसोदिया यांनी देखील फिर्यदीला आश्वासन देऊन आणखी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्या दोघांच्या सांगण्यावरुन, त्यांच्याकडे काम करणारा गणेश मगर, रा. फलकेवाडी, तसेच बी.टी.राऊत यांच्याकडे चेक द्वारे दिलेले असे एकूण २० लाख रुपयांची गुंतवणूक केली असून वेळोवेळी परताव्याची मागणी केली असता परतावा मिळत नसल्याने, गुंतवणूक केलेल्या रकमेची मागणी केली, त्यावेळी त्या तिघा भावंडांनी उडवाउडवीची उत्तरं देत रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे.