हातगावमध्ये चिमुकल्यांनी दिंडी काढून केली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबद्दल  जनजागृती

शेवगाव प्रतिनीधी, दि. १५ : आषाढी वारीचे औचित्य साधत तालुक्यातील हातगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील चिमुकल्यांनी गावातून शनिवारी ( दि.१३ ) प्रभात फेरी व दिंडी काढली. यावेळी दिंडीतील चिमुकल्यानी पर्यावरण व मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबद्दल जनजागृती केली.

यावेळी चिमुकले वारकरी माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामगजर पावली खेळण्यात दंग झाले. विठ्ठल रूख्मिणी तसेच वारक-यांच्या वेषात ते सहभागी झाले होते. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरूण दिवटे, मुख्याध्यापक गणेश पुरूषोत्तम, अंगणवाडी सेविका व मदतनीसही दिंडीत सहभागी झाल्या.

गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर, केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत सहभागी व्हा, झाडे लावा – झाडे जगवा, पाणी अडवा – पाणी जिरवा अशा घोषणा देत लाडकी बहिण योजनेसोबत पर्यावरण संवर्धनाचाही संदेश चिमुकल्यांनी दिला. ग्रामपंचातीच्या समोर तसेच भाजी बाजारात माऊली माऊली या गाण्यावरील नृत्य सादर करून तसेच फुगड्या खेळत मुलींनी ग्रामस्थांची वाहवा मिळवली.

ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब वाघुंबरे, संजय भालेकर, एकनाथ घुगे, विष्णू वाघमारे, संजीवन शेलार, अंबादास कांबळे, हरिभाऊ सरदार तसेच स्वाती ज-हाड, निकिता आंबेकर, अनुराधा दिवटे, कविता घरवाढवे, अनुराधा भालेराव, सुरेखा गाढे, बेबी निकाळजे, उषा भराट, उज्वला राजपूत  दिंडीत सहभागी झाल्या  होत्या.