कोपरगाव प्रतिनिधी, दि.२४ : कोपरगाव मतदार संघातील काकडी मल्हारवाडी परिसराला कमी दाबाने वीज पुरवठा मिळत असल्यामुळे येत असलेल्या अडचणीबाबत या दोन्ही गावातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी व्यक्तिश: लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला असून काकडी मल्हारवाडी व परिसरातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
काकडी-मल्हारवाडी परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा मिळत असल्यामुळे कृषी पंप ग्राहक व घरगुती ग्राहकांच्या अडचणी वाढल्या होत्या. नागरिकांनी याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपल्या अडचणी सांगितल्या होत्या. मात्र, प्रश्न सुटला नव्हता. त्यामुळे या दोन्ही गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांना कमी दाबाने मिळणारा वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांबाबत सविस्तर चर्चा केली होती.
या चर्चेतून आ.आशुतोष काळे यांनी काकडी-मल्हारवाडी परिसराला पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा व्हावा यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूने वीज पुरवठा करण्याच्या सूचना करून तातडीने कामाला सुरुवात करावी यासाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काकडी-मल्हारवाडी परिसरातील एकूण दहा ट्रान्सफार्मरला विमानतळाच्या बाजूने वीज पुरवठा करण्याच्या कामास प्रारंभ केला आहे.
हे काम पूर्ण होताच नागरिकांचा मागील अनेक दिवसांपासूनचा प्रश्न निकाली निघणार असून रांजणगाव देशमुखच्या वीज उपकेंद्रावरील भार देखील कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आमच्या व्यथा जाणून घेवून प्रश्न निकाली काढल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.