कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : कर्मवीर शंकरराव काळे यांनी विद्यार्थ्यांना ग्रामिण भागातच इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी गौतम पब्लिक सुरु केले. त्यामुळे ग्रामिण भागातील मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय उपलब्ध होवून या संधीचे सोने करीत गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी राज्य, देशासह परराज्यात देखील उच्च पदावर कार्यरत आहेत हि अभिमानास्पद बाब आहे. असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव चैताली काळे यांनी केले आहे.
नेदरलँड येथे सिनिअर डीझाईन इंजीनीअर म्हणून कार्यरत असलेल्या गौतम पब्लिक स्कूलचे शैक्षणिक वर्ष २०११ चे माजी विद्यार्थी शुभम बाळासाहेब मोरे यांचा गौतम पब्लिक स्कूलमध्ये चैताली काळे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शाळेचे प्राचार्य नूर शेख उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना माजी विद्यार्थी शुभम मोरे म्हणाले की, आपली शाळा यशाची गुरुकिल्ली असून शाळेच्या माध्यमातून महत्वपूर्ण पायाभरणी होते. ज्या वेळेस पाया पक्का असेल त्यावेळी कळस होतो. अर्थात उंच शिखर व आपले ध्येय गाठने सहज शक्य होते. त्यामुळे शालेय शिक्षण घेत असतांना शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे.
सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी, आत्मविश्वास, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, स्वयंशिस्त, प्रत्येक परीक्षा, स्कॉलरशिप, खेळ, अवांतर परीक्षेमध्ये न घाबरता विद्यार्थ्यांनी सहभागी होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी छोटे छोटे लक्ष गाठण्यासाठी उद्दिष्ट ठेवले पाहिजे तरच मोठे लक्ष साध्य करता येते. याची प्रचीती मी घेतली असून गौतम पब्लिक स्कूल मध्ये शिक्षण घेवून मी माझे ध्येय साध्य केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोक काळे, विश्वस्त आमदार आशुतोश काळे, सचिव चैताली काळे, सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख यांनी शुभम मोरे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नेदरलँड येथे सिनिअर डीझाइन इंजीनीअर म्हणून कार्यरत असलेल्या गौतम पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी शुभम मोरे यांचा सत्कार करतांना चैताली काळे समवेत प्राचार्य नूर शेख उपस्थित होते.