दीक्षा भूमी सामाजिक चळवळीचे प्रेरणास्थान – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : दलित समाज बांधवांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी व अनेक वर्ष अन्याय, अत्याचाराच्या ओझ्याख़ाली दबलेल्या दलितांच्या आयुष्याला कलाटनी देणाऱ्या, त्यांना मानाने कस जगायचं हे शिकवणारी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या ऐतिहासिक घटनेची पवित्र दीक्षा भूमी सामाजिक चळवळीचे प्रेरणास्थान असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे आ. आशुतोष काळे हिवाळी अधिवेशनासाठी गेले आहेत. शुक्रवार (दि.१५) रोजी अधिवेशन कामकाज सुरु होण्यापूर्वी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शहरातील दीक्षा भूमीला भेट देवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेतले.

बौद्ध धर्म प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वे शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता असल्यामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा भूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह भारतीय भूमीतील बौद्ध धर्माचा स्विकार केला होता. सामाजिक क्रांतीची जन्मभूमी व आंबेडकरवादी बौद्ध धर्माचे पहिले तीर्थक्षेत्र नागपूर येथील दीक्षा भूमीला इतर धर्माच्या श्रद्धास्थानासारखे महत्व प्राप्त झालेले आहे. 

हजारो वर्षाच्या दडपशाहीविरुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या एल्गाराची साक्ष देणारी हि पवित्र भूमी ६७ वर्षानंतरही प्रेरणा देत असून यापुढील काळातही प्रेरणा देत राहणार आहे. ज्याप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य दीनदलितांच्या उद्धारासाठी वेचले त्या विचारांची प्रेरणा घेवून त्यांच्या वाटेवर चालत असतांना मतदारसंघातील सामान्य नागरिकांच्या स्वप्नांना न्याय देण्यासाठी मी यापुढे देखील कटिबद्ध राहील. पवित्र दीक्षा भूमीला वंदन केल्यानंतर मला देखील समाजसेवेसाठी अधिकची उर्जा मिळाली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.