नगरपरिषदेच्या अनागोदी कारभारावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे- स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हे लोकप्रतिनिधीच्या स्वय सहाय्यकाच्या संगनमताने मनमानी कारभार करत असून, शहरातील नागरिक अशुद्ध व अनियमित पाणीपुरवठा, खराब रस्ते, अस्वच्छता यासारख्या अनेक समस्यांमुळे हैराण झालेले असताना त्याकडे मुख्याधिकारी दुर्लक्ष करत आहेत. न. प. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. याकडे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी तातडीने लक्ष देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोपरगाव नगरपरिषदेत ‘प्रशासक राज’ असून, मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या दुर्लक्षामुळे व कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक नसल्यामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सध्या शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला असून, नगर परिषदेकडून नागरिकांना अतिशय गढूळ, मैला, शेवाळयुक्त व दुर्गंधी येत असलेल्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

हेच दूषित पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. याबाबत तक्रारी करूनही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोसावी दखल घेत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कोपरगाव नगरपालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या मनमानी कार्यपद्धतीबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. मुख्याधिकारी गोसावी हे कार्यालयीन वेळेत कधीच नगरपरिषद कार्यालयात उपस्थित नसतात. कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर ते सायंकाळी पाच वाजेनंतर नगरपरिषद कार्यालयात येतात आणि फक्त सोयीची व वैयक्तिक लाभाची कामे करतात.

नगरपालिकेतील सर्व विभागांचे काम बंद झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधीच्या स्वय सहाय्यकाच्या संगनमताने मुख्याधिकारी व ठेकेदारांमध्ये ‘रात्रीस खेळ’ चालतो. त्यामुळे नगरपरिषदेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, सायंकाळनंतर नगरपरिषदेत काय कामे चालतात, याबाबत मी स्वत: पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आपल्या व प्रांताधिकाऱ्यांसमोर वारंवार मांडले आहे.

यावेळी मुख्याधिकारी गोसावी हे देखील उपस्थित होते. याची आठवण स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना यावेळी करून दिली. ना मुख्याधिकाऱ्यांवर कोणाचा वचक आहे, ना मुख्याधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक, अशी स्थिती सध्या पहायला मिळत आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे लोकप्रतिनिधीच्या इशाऱ्यानुसार मनमानी काम करून नागरिकांना वारंवार वेठीस धरत असून, त्याचे परिणाम नागरिकांना सहन करावे लागत आहेत.

याबाबत आपणास अनेकदा सांगूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी कुणाकडे दाद मागायची, असा संतप्त सवाल कोल्हे यांनी केला आहे. कोपरगाव शहरात होत असलेला अशुद्ध व दूषित पाणीपुरवठा, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या गटारी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नगरपरिषदेच्या वतीने शहरात नियमित साफसफाई केली जात नाही. आधीच शहरात मोठ्या प्रमाणावर डासांनी उच्छाद मांडलेला असताना दूषित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने डेंग्यू, कावीळ, अतिसार, थंडी, ताप, खोकला आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नगरपरिषदेकडून दररोज शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, आरोग्य, रस्ते, गटारी, वीज व इतर मूलभूत सोयी-सुविधांची पूर्तता करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात नगरपरिषद प्रशासन साफ अपयशी ठरले आहे.

कर भरूनही नगरपरिषदेकडून मूलभूत सोयी-सुविधांची पूर्तता केली जात नसल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे. नगरपरिषद गेल्या कित्येक दिवसांपासून शहरवासियांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा करीत आहे. त्यातही गाळमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.

नगरपरिषदेकडून आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी पाणीपट्टी मात्र संपूर्ण वर्षाची घेतली जाते. शहरातील विविध समस्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही त्याचा निपटारा होत नाही. मुख्याधिकारी कोणत्याही प्रभागात भेट देऊन समस्यांचे निवारण करीत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तसेच शहरातील विविध विकासकामे अतिशय संथ गतीने होताना दिसत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करावी व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.