सोमैया महाविद्यालयात संयुक्त आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : स्थानिक के.जे. सोमैया महाविद्यालयात आधुनिक भाषा आणि अध्यापन पद्धती या विषयावर आंतरराष्ट्रीय संभाषणाचे आयोजन अकादमी पेंगाजियन बहासा, केदाह ब्रांच, यु.आय.टी.एम.मारा विद्यापीठ, मलेशिया आणि मुहामादीयाह माताराम विद्यापीठ इंडोनेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. विजय ठाणगे यांनी दिली. 

याप्रसंगी मारा विद्यापीठाचे केदाह शाखेच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. अजलान रहेमान यांनी आपल्या प्रास्ताविकात “या आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजनाचा हेतू हा आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण पद्धती आणि संशोधन यांना चालना देणे हा आहे” असे स्पष्ट करून उपस्थितांचे स्वागत केले. चर्चासत्राचे आणि सामंजस्य कराराचे समन्वयक डॉ. रवींद्र जाधव आणि प्रा. सियाझलियाती इब्राहिम यांनी यावेळी मारा विद्यापीठ आणि सोमैया महाविद्यालय यांच्यात शैक्षणिक, संशोधन, चर्चासत्र, फॅकल्टी एक्सचेंज, स्टुडंट्स एक्सचेंज प्रोग्रॅम, अंतरसंकृती देवाणघेवाण आदी शैक्षणिक उपक्रम आयोजनासाठी सामंजस्य करार झाला आहे.

थोड्याच दिवसात मुहामादीयाह माताराम विद्यापीठ, इंडोनेशिया बरोबर सामंजस्य करार होणार आहे. हे सांगतानाच या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संभाषणात मलेशिया, इंडोनेशिया येथील विद्यापीठातील आणि सोमैया महाविद्यालयातील डॉ. मुहम्मद झुलकेपली, प्रा. नूर ताहीर, डॉ. रवींद्र जाधव, प्रा. नूर शेफाई, प्रा. बर्लिन मोरात, प्रा. सियाझलियाती इब्राहिम, डॉ. विजय ठाणगे, व डॉ. नितीन शिंदे आदी प्राध्यापकांनी भाषा, संस्कृती, अध्यापन आणि शिक्षण अनुप्रयोगांशी संबंधित आपले शोधनिबंध सादर केले. या संभाषण सत्रात 35 प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. 

या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाबद्दल को.ता.एज्यू. संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव ऍड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी संयोजकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.