विवेक कोल्हे यांच्या समयसूचकतेमुळे वाचले अपघातग्रस्तांचे प्राण 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७: सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी समयसूचकता दाखवत शिर्डी-राहाता रोडवर अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका दाम्पत्याला तातडीने आपल्या गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले.

विवेक कोल्हे यांनी अपघातग्रस्त दाम्पत्यास वेळीच मदत करून त्यांचा जीव वाचविला आणि लोकप्रतिनिधीने कसे वागावे याची प्रचिती या घटनेतून आणून दिली आहे. विवेक कोल्हे यांनी समयसूचकता व तत्परता दाखवून अपघातग्रस्त व्यक्तींना उपचार मिळण्यासाठी वेळीच मदत करून जीवदान दिले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जनतेवर जेव्हा केव्हा संकट कोसळते तेव्हा कोल्हे परिवार जनतेच्या मदतीला धावून जातो. माजी मंत्री सहकारमंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी संकटग्रस्तांना मदत करण्याची दिलेली शिकवण त्यांचे नातू विवेक कोल्हे हे सतत आचरणात आणत असतात. अडीअडचणीच्या व संकटाच्या काळात लोकांना मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात. विविध कार्यक्रमानिमित्त प्रवास करत असताना अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला विवेक कोल्हे धावून गेल्याचे अनेकदा पहायला मिळाले. असाच प्रसंग शुक्रवारी (१६ जून) घडला.

नगर-मनमाड महामार्गावर राहाता येथील गोदावरी वसाहतीजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शुक्रवारी भरदुपारी दुचाकीवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात हे दाम्पत्य जखमी झाले. त्यांना तातडीने उपचाराची गरज होती; पण त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी वाहन उपलब्ध नव्हते. याच वेळी विवेक कोल्हे हे काही कामानिमित्त राहाता येथे जात होते. सध्या राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असतानादेखील विवेक कोल्हे यांनी समोर अपघात झाल्याचे पाहून आपली गाडी थांबवली.

गाडीतून खाली उतरून त्यांनी या अपघाताची माहिती घेतली. वेळ न घालवता कोल्हे यांनी समयसूचकता दाखवून भरउन्हात उपचाराच्या प्रतीक्षेत रस्त्यावर पडलेल्या या अनोळखी अपघातग्रस्त व्यक्तींना ताबडतोब आपल्या गाडीतून शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी मोबाईलवर संपर्क साधून या अपघातग्रस्तांवर त्वरित उपचार करण्याची विनंती केली. विवेक कोल्हे यांनी केलेल्या मदतीमुळे सदर अनोळखी अपघातग्रस्त व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यामुळे पुढील अनर्थ घडला. 

विवेक कोल्हे यांनी सदर अपघातग्रस्त व्यक्तींना आपल्या गाडीतून शिर्डी येथे रुग्णालयात पोहोचविल्यानंतर कसलाही बडेजाव न करता ते कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून पुढील प्रवासासाठी रवाना झाले आणि साधेपणाचा प्रत्यय उपस्थितांना आणून दिला. एरव्ही कुठे अपघात झालेला दिसला तरी बरेच लोक अपघातग्रस्तांना मदत न करता तसेच निघून जातात. मात्र, राहाता येथे रस्त्यावर मोटारसायकलचा अपघात होऊन दोन अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडल्याचे विवेक कोल्हे यांना दिसले.

यावेळी कोल्हे यांनी मानवतेचे व माणुसकीचे दर्शन घडवले. घाई गडबडीत असतानादेखील त्यांनी ताबडतोब आपल्या स्वत:च्या गाडीतून जखमी व्यक्तींना रुग्णालयात पाठविले. विवेक कोल्हे यांनी वेळीच मदत केल्यामुळे या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींचे प्राण वाचू शकले. कोल्हे यांनी कुठलाही बडेजाव न करता माणुसकीचा धर्म निभावत अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनोळखी व्यक्तींना मदत करून जीवदान दिले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.