कोपरगांव प्रतिनिधी, दि. १९ : तालुक्यातील ऐतिहासिक व पौराणिक महत्व असलेल्या श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा तीनखणी मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरूपौर्णिमेनिमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे.
२१ जुलै रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत सौ छाया व श्री. संभाजी विश्वनाथ सदाफळ या उभयतांच्या हस्ते रामदासीबाबा मुर्तीस कोकमठाण, कोपरगांव बेट व कोपरगांव येथील ब्रम्हरूदांच्या साक्षींने महामस्तकाभिषेक व लघुरूद्र पुजा, त्यानंतर १० वाजता कारवाडी कोकमठाण येथील हभप अरूण महाराज रोहोम यांचे जाहिर हरी किर्तनाचा कार्यकम होवुन त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
भिलवडी सांगलीचे रामदासी बाबा यांनी गोदावरी नदीकाठी श्रीक्षेत्र कोकमठाण येथे तपसाधना करत तीनखणीत संपुर्ण आयुष्य व्यतीत केले. पेशव्यांची भरजरी वस्त्र सातारा परिसरातील मसुरी या गावातुनच तयार होत त्या मसुरी गांवचे विनायक महाराज मसुरकर हे रामदासीबाबांचे गुरू होते. सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ किसन डहाळे सर व रामदासीबाबा भक्त मंडळ कोकमठाण यांनी रामदासीबाबांच्या कार्याचे संशोधन व अभ्यास करत कृष्णा गोदाकाठचे योगी रामदासीबाबा, तीनखणीचा रामानुभव, व रामदासीबाबा आणि समर्थविचारधारा या तीन पुस्तकांचे लेखन करून बाबांचे सर्व जीवनकार्य समाजासमोर आणले आहे.
तरी जास्तीत जास्त भाविकांनी या उत्सवास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन तनमनधनाने सहकार्य करून सर्व धार्मिक कार्यकमांचा लाभ घ्यावा. गुरूपौर्णिमेनिमीत्त रामदासीबाबा मुर्तीस लेपन व चकाकी करण्यांत आल्याने त्याचे सौंदर्यात आणखी भर पडली आहे. रामदासीबाबांनी या तीनखणीतुन पंचक्रोशीतील भाविकांना अध्यात्मीक संस्काराची दिशा दिलेली आहे. या स्थानावर त्यांचे पुण्यतिथीचा उत्सव मोठ्या प्रमाणांत साजरा केला जातो. विशेष सागवणी लाकडाच्या रामदासीबाबांच्या खडावा तयार केल्या आहेत.
गुरूपौर्णिमेनिमीत्त मंदिर परिसरात रोषणाई करण्यांत आली असुन सभामंडपाच्या कामामुळे या परिसराची भव्यता वाढली आहे. पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिर, लक्ष्मीमाता देवयानी, विभांडक ऋषी आश्रम, लखनगिरी महाराज मंदिर याच परिसरात असल्यांने भाविकांसह पर्यटकांना विशेष पर्वणी साधली जात आहे. ब्रम्हलिन स्वामी लखनगिरी महाराजांनी याच तीनखणीतुन असंख्य भाविक रूग्णांचे असाध्य आजार आर्युवेदीय तसेच विविध जुनाट वनस्पती औषधांनी बरे केले होते.