कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : आमदार आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगाव शहरातील नागरिकांना दाखविलेले स्वप्न सत्यात उतरणार असून ५ नंबर साठवण तलाव कोपरगावच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कोपरगाव शहरातील नागरिक मागील काही वर्षापासून तीव्र पाणी टंचाईची झळ सोसत होते. महिला भगिनींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. कधी दहा ते पंधरा दिवस व उन्हाळ्यात तर २१ दिवसांनी कोपरगाव शहराला पाणी पुरवठा होत होता. कोपरगावच्या नागरिकांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट कायमची थांबविण्यासाठी २०१९ पूर्वी आ. आशुतोष काळे यांनी वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ५ नं. साठवण तलावाच्या कामाचा पाठपुरावा करून सातत्याने ५ नंबर साठवण तलावाच्या प्रश्नाबाबत आवाज उठवला होता.
२०१९ ला ज्यावेळी आ. आशुतोष काळे यांना कोपरगावच्या जनतेने सेवा करण्याची संधी दिली त्यावेळी पहिल्या तीन महिन्याच्या आतच आपल्या कारकिर्दीतील पहिल्या विकास कामांचा श्री गणेशा त्यांनी ५ नं. साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाई कामास प्रारंभ करून केला. या ५ नं. साठवण तलावाचे आज पर्यंत जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सुनील गंगुले यांनी सांगितले आहे.
या साठवण तलावाला विरोधकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे विरोध करण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील केला असला तरी हे सर्व प्रयत्न आ. आशुतोष काळे यांच्या निर्धारापुढे टिकाव धरू शकले नाही. आ. आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी दिल्यामुळे या निधीतून भव्य दिव्य साठवण तलाव उभारला आहे.पाण्याचे जलकुंभ देखील उभे राहिले असून वितरण व्यवस्थेचे काम देखील पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. साठवण तलावाच्या चोहोबाजूंनी भक्कम आर. सी.सी.भिंत असल्यामुळे पाणी चोरी देखील होणार नाही.
साठवण तलावाचे काम सुरु झाल्यापासून कोपरगाव शहरातील बहुतांश नागरिकांनी विशेषत: महिला भगिनींनी स्वत: जाऊन ५ नंबर साठवण तलावाचे सुरु असलेले काम पाहिले आहे. त्यामुळे संपूर्ण कोपरगावकर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो दिवस आ. आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून लवकरच उगवणार असून कोपरगावकरांची तहान भागविणारा ५ नंबर साठवण तलाव कोपरगावच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.