शासकीय इमारतीमुळे कोपरगाव शहराच्या वैभवात भर – मंदार पहाडे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : शासकीय इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येवू नये व त्यांची कामे लवकरात व्हावी व त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात या उद्देशातून आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील विविध शासकीय इमारतींना मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मोठ्या डौलाने उभ्या राहिलेल्या या शासकीय इमारतीमुळे कोपरगाव शहराच्या वैभवात भर पडली असल्याचे माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी म्हटले आहे.

विकासाची दूरदृष्टी व सर्वसामान्य जनतेप्रती तळमळ काय असते हे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहराच्या विकासासाठी दिलेल्या योगदानातून दिसून येत आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील त्यांच्या कार्यकाळात तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पशु-चिकित्सालय,न्यायालय इमारत अशा विविध शासकीय इमारती उभारून शासकीय कर्मचाऱ्यांना कामकाज करतांना येणाऱ्या अडचणी दूर केल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचे देखील या कार्यालयात होणारी कामे तातडीने होत होती.

त्यांचाच आदर्श घेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आ.आशुतोष काळे यांनी देखील सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याच्या संधीचे सोने करतांना कोपरगाव शहरातील विविध शासकीय इमारतींसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण पोलीस स्टेशन कार्यालय व कर्मचारी वसाहत, पंचायत समिती इमारत, पशु-चिकित्सालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारत, नगरपरिषद इमारत अशा विविध इमारतींना आजपर्यंत जवळपास ८२ कोटींचा निधी दिला आहे.

या निधीतून काही इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. काही अंतिम टप्यात असून काही इमारतींची कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच या सर्व इमारती उभ्या राहून शासकीय कामकाजात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत त्याचबरोबर या नूतन इमारतीमध्ये नागरिकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मिळणार असल्यामुळे नागरिकांच्या देखील अडचणी दूर होणार आहेत. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न आ. आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून ५ नं.साठवण तलावाच्या माध्यामतून मार्गी लागला आहे. शहरातील सर्वच रस्त्यांचा विकास झाल्यामुळे कोपरगाव शहराचे रुपडे पालटले असून शासकीय इमारती शहराच्या वैभवात भर घालीत असल्याचे माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी म्हटले आहे.