शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : शेवगाव पाथर्डी तालुक्यातील गोरगरीब शेतकरी नागरीक शिक्षक महिला आदींची शेअर मार्केट ट्रेडिंग च्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून कारवाई करावी. अन्यथा शेअर मार्केटमध्ये फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात तक्रारी न घेणाऱ्या शेवगाव पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी यांच्या कामकाज पद्धतीच्या विरोधात येत्या बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी बेमुदत ठिया आंदोलन पुकारण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांना निवेदनाद्वारे मंगळवारी (दि ३०) देण्यात आले.
परिसरात विविध नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग कार्यालये उघडून विविध क्षेत्रातील गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी महिला शिक्षक छोटे व्यावसायिक महिला शेतमजूरांना बारा ते पंचवीस टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून जाणाऱ्या शेअर मार्केट ट्रेडिंग चालका विरोधात त्वरित गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी शेवगाव पोलीस निरीक्षक व कर्मचारी अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
पोलीस निरीक्षकांचे व शेअर मार्केट चालकांचे हितसंबंध असल्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या शेअर मार्केट चालकावर गुन्हे दाखल होऊनही त्यांना जाणीवपूर्वक अटक केली जात नाही असे दिसून येते. तसेच जनतेला हजारो कोटी रुपयांचा चुना लाऊन पळून गेलेल्या ट्रेडर्स चालकांनी आपले नातेवाईक हीत संबंधिय व्यक्तीच्या नावावर स्थावर मालमत्ता केल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे अनेकांची फसवणूक करून पळून गेलेल्या शेअर ट्रेडर्स व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यात यावे तसेच त्यांना पळून जाण्यात मदत करणाऱ्या लोकांचा ही शोध घ्यावा. त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे. पळून गेलेल्या पैकी काहीजण ऑनलाईनने आपल्या विरोधात तक्रार केली तर तुमचे पैसे मिळणार नाहीत अशी ठेवीदारांना दमदाटी करीत असल्याच्याही तक्रारी आहेत. असे असतांना पळून गेलेले लोक पोलिसांना का सापडत नाही? असा सवाल प्रा चव्हाण यांनी केला आहे.
यावेळी वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, प्रितम गर्जे, साईनाथ भागवत, गहिनीनाथ कानकडे, रवींद्र नीळ, दत्ता औटी, बाबासाहेब थोरात, सोपान काळे, सागर गरुड, वसंत औटी, सचिन कणसे, अवधूत केदार, सचिन शिंदे, अन्सार कुरेशी, अशोक कापरे आदि उपस्थित होते.