खुनाचा प्रयत्न करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : तीन आठवड्यापूर्वी  शेवगाव तालुक्यातील एका कुटुंबावर खुनी हल्ला करून पसार झालेल्या आरोपी पैकी दोघा आरोपींना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी  जेरबंद केले.

यासंदर्भात थोडक्यात माहिती अशी की, गेल्या’  १३ जुलै, रोजी गोपीचंद अश्रु पोपळे (वय ६५ रा. बेलगांव, ता. शेवगांव हे त्यांची पत्नी व मुलगा त्यांचे शेतामध्ये खताची गाडी येण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करतांना रामदास गायके व इतर ५ जणांनी संगनमत करुन तुम्ही रस्त्यात खड्डे का करता व आमच्या शेतात पाणी सोडल्याने आमचे शेताचे नुकसान होते असे म्हणुन हातातील कु-हाड, लाकडी दांडके, काठ्या व कोयता घेवुन पोफळेव त्यांचे कुटूंबियांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केले बाबतची तक्रार शेवगांव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सदरची घटना घडल्या पासुन यातील आरोपी हे फरार झाले होते.

या संदर्भात जिल्हा पोलिस प्रमुख  राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन, आवश्यक कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि तुषार धाकराव, पोहेकॉ  संतोष लोढे, पोना फुरकान शेख, पोकॉ रविंद्र घुगांसे, जालींदर माने, मयुर गायकवाड व चापोहेकॉ उध्दव टेकाळे यांचे पथक तयार करुन आरोपीची माहिती काढणेकामी आवश्यक सुचना देवुन रवाना केले.

पथकाने शुक्रवारी ( दि २) महादेव गायके ( वय २०) व गणेश गायके (वय १९ दोघे रा. बेलगाव या दोघा आरोपींना पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर कारखाना परिसरा पकडून त्यांना शेवगांव पोलीस स्टेशनला हजर केले आहे. सदरची कारवाई प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक व  सुनील पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.